नितीन गडकरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संमेलननागपूर : राष्ट्रोन्नतीसाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली आहे. देशाला बलिदानाचा इतिहास आहे. हा इतिहास जपण्याची जबाबदारी युवकांची आहे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ट वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे माधवनगरातील पीएमजी सभागृहात आयोजित या संमेलनाचे गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस, परिषदेचे अखिल भारतीय संघटनमंत्री सुनील आंबेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश तापस, प्रांताध्यक्ष प्रा. केदार ठोसर, प्रांतमंत्री स्वप्निल कठाळे प्रमुख अतिथी होते. राष्ट्रोन्नतीच्या हवनात अनेकांनी स्वत:च्या प्राणाची आहुती दिली आहे. असे कार्यकर्ते आजच्या काळातही आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने बलिदानासाठी सज्ज राहिले पाहिजे. कोणतीही अपेक्षा न ठेवता जोमाने कार्य करणे आवश्यक आहे. सर्वांनी संघटनेच्या मागे ताकदीने उभे राहावे. देश व गरिबांच्या विकासाकरिता लढणारी ही एक वैचारिक संघटना आहे. आपला उद्देश अद्यापही पूर्ण झालेला नाही. परिणामी तन, मन व धनाने कामाला लागा, असे आवाहन गडकरी यांनी केले.परिषदेंतर्गत काम करताना खूप शिकायला मिळते. परिषदेचा कार्यकर्ता विपरीत परिस्थितीत कार्य करतो. यामुळे तो संघर्षशील व मनाने बळकट असतो, असे फडणवीस यांनी सांगितले. संमेलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.(प्रतिनिधी)
देशाला बलिदानाचा इतिहास
By admin | Updated: August 25, 2014 01:16 IST