शिवसेना मेळावा : आ. दीपक सावंत यांचे प्रतिपादन नागपूर : शिवसेनेचा भगवा हा तेजस्व व हिंदुत्वाचे प्रतीक आहे. हिंदुस्तानात राहणारा प्रत्येक जण हिंदू आहे. मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार व संपर्कप्रमुख डॉ. दीपक सावंत यांनी केले. शिवसेनेच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. नवीन सुभेदार येथील श्री प्रभू सांस्कृतिक सभागृहात गुरुवारी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला माजी खासदार प्रकाश जाधव, सत्कारमूर्ती चंद्रहास राऊ त, सतीश हरडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे, राजू हरणे, पांडुरंग बुराडे, नगरसेविका अल्का दलाल, वंदना लोणकर, सुरेखा खोब्रागडे, सूरज गोजे, किशोर कुमेरिया, बंडू तळवेकर व जगत सिन्हा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवसेनेचे किरण पांडव यांच्या हस्ते सत्कारमूर्ती आ.डॉ. दीपक सावंत व चंद्रहास राऊ त यांना शाल-श्रीफळ व शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊ न जाहीर सत्कार करण्यात आला. डॉ. सावंत पुढे म्हणाले, सध्या हिंदुत्वावर टीका होत आहे. त्यामुळे ते समजून सांगण्यासाठी स्वत: सरसंघचालक मोहन भागवत व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मैदानात उतरावे लागले आहे. शिवसेना हा एक विचार आहे. माणूस मरतो, मात्र विचार कधीही मरत नाही. सध्या राज्यात राजकीय स्पर्धा लागली आहे. डोळ्यासमोर विधानसभा निवडणुका आहे. राज्यात सध्या शिवसेनेला पोषक वातावरण आहे. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर ते कायम राखण्याची जबाबदारी आहे. नागपुरातून विधानसभेत शिवसेनेचा भगवा जात नाही, ही नेहमीची खंत राहिली आहे. मात्र आगामी निवडणुकीत नागपुरात भगवा फडकलाच पाहिजे, असे त्यांनी यावेळी शिवसैनिकांना आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण पांडव यांनी केले. संचालन मोहन बाजपेयी यांनी केले. (प्रतिनिधी)
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व
By admin | Updated: August 22, 2014 01:32 IST