पुणे : हिंदू समाजाची शक्ती ही सज्जनांना आश्वस्त करणारी आहे आणि दुर्जनांनी सज्जन व्हावे, अशी प्रेरणा देणारी आहे. याचे दर्शन म्हणजेच शिवशक्ती संगम, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी येथे व्यक्त केले.संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांततर्फे आयोजित ‘शिवशक्ती संगम’च्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. फुलगाव येथील सागर आश्रमाचे स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या हस्ते हिंजवडीजवळील मारुंजी गाव येथे रविवारी भूमिपूजन झाले. जोशी म्हणाले, ‘समाजामध्ये सज्जनशक्ती उभी करण्याचे काम संघ ९० वर्षांपासून करीत आहे. समाजातील सर्व स्तरांमध्ये संघाचे काम पोहोचले आहे,’ असे ते म्हणाले. स्वामी स्वरुपानंद म्हणाले, ‘जातीपातीमध्ये विस्कळीत झालेल्या हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी संघटनेची गरज आहे. त्यामुळेच ‘शिवशक्ती संगम’सारखे कार्यक्रम काळाची गरज आहे़’ प्रांत कार्यवाह विनायकराव थोरात यांनी सांगितले की, ‘१९८३ साली तळजाईला संघाचे शिबीर झाल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुण्यात संघाचे सांघिक होत आहे. राज्यातील दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर निधी संकलनाचे कार्य, तसेच दुष्काळग्रस्त भागात जनकल्याण समितीतर्फे चारा छावण्या उभारण्याचे कार्य स्वयंसेवक करीत आहेत़ शिवशक्ती संगमसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतून स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत. ४५० एकर परिसरात हा कार्यक्रम होणार आहे.’ (प्रतिनिधी)
हिंदू समाज सज्जनांना आश्वस्त करणारा
By admin | Updated: October 19, 2015 03:04 IST