कोल्हापूर : राज्यातील हिंदकेसरी मल्लांचे मानधन मार्च अखेरपर्यंत संबंधित मल्लांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. तसेच यापुढे ते रखडणार नाही याची खबरदारी घेऊ, अशी ग्वाही राज्याचे क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गेले वर्षभर मानधन न मिळाल्याने ज्येष्ठ मल्लांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्याबद्दल ‘लोकमत’ने आवाज उठविला होता. भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना राज्य शासनातर्फे त्यांच्या कामगिरीची दखल म्हणून गेली अनेक वर्षे दर महा सहा हजार इतके मानधन दिले जाते. मात्र, त्यांचे ७२ हजार इतके मानधन पुन्हा रखडले. तसेच हिंद केसरी सर्वश्री गणपतराव आंदळकर, दीनानाथसिंह, विनोद चौगुले, रुस्तम-ए-हिंद दादू चौगुले यांचेही मानधन रखडले आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना ‘हिंद केसरी’ व ‘महाराष्ट्र केसरी’च्या मल्लांना दरमहा दहा हजार रुपये मानधन देण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला. मात्र याबाबत सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. ‘वाढीव मानधनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे. निर्णय ते घेतील,’ असे क्रीडा सहसंचालक सोपल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘हिंदकेसरीं’चे मानधन मार्चअखेरीस देणार
By admin | Updated: March 21, 2015 01:36 IST