स्नेहा मोरे,
मुंबई-छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील ‘हिमालयन कलादालन’ वर्षभरानंतर पुन्हा एकदा कलारसिकांच्या भेटीला येत आहे. केंद्र सरकारच्या ‘रिस्टोरेशन प्रोजेक्ट’अंतर्गत संग्रहालयाने या कलादालनाचे रूपडे पालटले असून हिमालयाचे सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक पैलू उलगडणाऱ्या कलाकृतींचा यात समावेश आहे. शिल्पकार चेमेट रिगझिन यांनी सहा फुटांचे मातीचे हे बसलेल्या स्वरूपातील मैत्रेय बुद्ध शिल्प २०१५ साली संग्रहालयाच्या आवारात साकारले. यासाठी त्यांना खास तिबेटवरून आमंत्रित करण्यात आले होते. या प्रक्रियेचे व्हिडीओ डॉक्युमेंटेशन करण्यात आले असून ही चित्रफीत हिमालयन कलादालनात दाखविण्यात येणार आहे. नव्या रूपातील हिमालयन कलादालनात इसवीसन पूर्व १३ व्या शतकातील नेपाळमधील ब्राँझ मैत्रेय बुद्धाचे शिल्प मांडण्यात आले आहे. शिवाय, इसवीसन पूर्व १६ व्या शतकातील किंग सोन्ट्सेन गॅम्पो यांचे शिल्प तिबेटहून संग्रहालयात आणण्यात आले, हे शिल्पही या कलादालनात सादर करण्यात आले आहे. या कलादालनाचे काम करणाऱ्या चमूने सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांची मुलाखतही अमूल्य संग्रहाकरिता घेतली.केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ‘मेट्रो म्युझियम मॉर्डनायझेशन प्लान’अंतर्गत या कलादालनाचे रिस्टोरेशन करण्यात आले आहे. या कलादालनाचे उद्घाटन ७ मे रोजी हिमाचल प्रदेशच्या लायब्ररी आॅफ तिबेटीयन वर्क्स आणि अर्काइव्ह्स इन धर्मशाळाचे संचालक गेशे लाखडोर यांच्या हस्ते होणार आहे. >संग्रहालयाच्या बृहद्प्रकल्पांतर्गत या कलादालनाला नवसंजीवनी देण्यात आली आहे. शिवाय, बऱ्याचशा नव्या कलाकृतींसह हे कलादालन पर्यटक आणि कलारसिकांच्या भेटीला येत आहे. तसेच भविष्यातही संग्रहालयात कलाकृती संचयात भर घालण्यासाठी नवनव्या कल्पनांवर व्यवस्थापन काम करत आहे.- डॉ. मनीषा नेने, प्रकल्पप्रमुख