शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

ऊंचे लोग, नीची पसंद...

By admin | Updated: August 30, 2015 01:05 IST

एखाद्या मालिकेत शोभेल अशाप्रकारे शीनाच्या हत्येत आपण जितकं लक्ष घातलंय, तितकं लक्ष इतरत्र घालतो का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी स्वत:ला विचारण्याची गरज आहे.

- प्रा. दीपक पवार

एखाद्या मालिकेत शोभेल अशाप्रकारे शीनाच्या हत्येत आपण जितकं लक्ष घातलंय, तितकं लक्ष इतरत्र घालतो का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी स्वत:ला विचारण्याची गरज आहे. दाभोलकर,पानसरेंची हत्या झाली तेव्हा इंग्रजी, हिंदी प्रसारमाध्यमांनी त्यांच्यासाठी किती वेळ दिला? त्यांचं ग्लॅमर कमी पडलं असेल का? माणसांच्या खुनात काय फरक आहे? हजारो माणसांची आयुष्यं बदलणारी माणसं मारली जातात आणि झगमगाटातली जीवनशैली असलेली धनाढ्य माणसंही. श्रीमंतांचा मृत्यू जास्त मोलाचा आहे का? शीना बोराच्या खुनातलं क्रौर्य अंगावर येणारंच आहे; पण नितीन आगेच्या खुनात क्रौर्य नव्हतं? घरोघरी लेकी, सुना मारल्या, जाळल्या जातात; त्याचा दाह कमी असतो का? मग सगळ्यांचे मृत्यू तितकेच महत्त्वाचे का ठरत नाहीत आपल्यासाठी? स्टार टीव्हीचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी ही आपल्याच मुलीच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात गेल्यामुळे बऱ्याच जणांचे डोळे पांढरे झाले आहेत. कालपरवापर्यंत ज्या बाईबद्दल उच्चभ्रू समाजात चांगलं मत होतं, तिच्याबद्दल आता काय बरं मत द्यावं, असा विचार करून पेज थ्रीच्या पार्ट्या करणाऱ्यांना आता कुठे तोंड लपवावं असं झालं असेल. पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या मुलीचं तिसऱ्या नवऱ्याच्या मुलाशी अफेअर आहे म्हणून दुसऱ्या नवऱ्याच्या मदतीने मारणं, आपली मुलगी ही बहीण म्हणून सादर करणं आणि एका मोठ्या कॉपोर्रेट कंपनीचा सीईओ असणाऱ्या माणसाने त्यावर विश्वास ठेवणं किंवा तसं म्हणणं एखाद्या थरारपटाला लाजवेल असा सगळा प्रकार आहे. आता तर या बार्इंची एकूण पाच लग्नं झालीत अशा बातम्या पेपरांमध्ये येत आहेत. नेहमीप्रमाणे चॅनेलवाल्यांनी ताळतंत्र सोडून बातम्या द्यायला सुरुवात केलीय. इंद्राणीने सँडविच खाल्लं याची बातमी करणाऱ्याला खरंतर पोकळ बांबूचे फटकेच द्यायला पाहिजेत. पण या प्रकारच्या उठवळपणाचे सार्वत्रिकीकरण झाल्याने लाज तरी कशाकशाची वाटून घ्यायची, असा प्रश्न निर्माण झालाय.सोशलाइट लोकांचं पार्टीतलं दिसणं हे दारिद्र्य, उपासमार वगैरे नेहमीच्या आणि किरकोळ विषयांपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे, असं जाहीर करून पत्रकारितेचा बट्ट्याबोळ करणाऱ्या मंडळींनी पानंच्या पानं या विषयाला वाहिलीत. कारण स्पष्ट आहे. त्यांचा वाचक तोच आहे. दुसऱ्याच्या बेडरूममध्ये काय चाललंय याच्या नसत्या चौकशांना जे लोक बातमीदारी म्हणतात, त्यांच्या दृष्टीने हे स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. राजकीय, सामाजिक बातम्या छापून त्यांच्या सर्जनशील पत्रकारांचं आणि वाचकांचं जे कुपोषण झालं असेल, ते भरून काढण्याची नामी संधी हाती आल्यावर ते कशाला सोडतील? त्यामुळे त्यांना समजून घ्यायलाच हवं. हिंदी सिनेमांमध्ये काहीही छोटीमोठी भानगड झाली की लोक थेट कमिशनरलाच फोन लावतात. त्यामुळे मधल्या पदांवरचे लोक त्या खात्यात काम करतात की नाही, अशी शंका वाटायची. मुखर्जी प्रकरणात ज्या पद्धतीने राकेश मारिया स्वत: काम करताहेत, त्यावरून ते खरंच असावं असं वाटतंय. याआधी गुंतागुंतीची खून प्रकरणं झाली नाहीयेत का? का या वेळेस प्रकरणावर मीडियाचं नको इतकं लक्ष आहे म्हणून मारियांनी लक्ष घातलंय ?अजून या प्रकरणाचा तपास पुरा व्हायचाय. इंद्राणी मुखर्जी यांच्या पहिल्या (?) लग्नापासून झालेला मुलगा मिखाईल काही गुपितं राखून आहे. ज्या ड्रायव्हरचा शीना बोराच्या हत्येत सहभाग आहे असं म्हणतात, त्याच्या बायकोने श्रीमंत माणसं आपल्या नवऱ्याला अडकवतील अशी शंका व्यक्त केली आहे. पीटर मुखर्जी यांच्या पहिल्या लग्नापासून झालेला मुलगा आणि शीनाचा प्रियकर शीना एक दिवस अचानक गायब होते, अमेरिकेत स्थायिक होते, या इंद्राणीच्या बोलण्यावर आणि पोलिसांत एक तक्रार दाखल करून गप्प राहतो, हे जितकं धक्कादायक आहे त्यापेक्षा जास्त धक्कादायक आहे ते पीटर मुखर्जी यांनी आपल्याला शीना ही इंद्राणीची मुलगी आहे हे माहीत नव्हतं, असं म्हणणं. ते सरळ सरळ खोटं वाटतं. कारण शीना आणि त्यांचा मुलगा दोघांनीही गुपितं उलगडल्यावरही त्यांच्यावर विश्वास न ठेवणारा माणूस महामूर्ख तरी असेल किंवा महाबदमाश तरी. अजून यातला प्रत्येक जण त्याच्या पापांसहित लोकांपुढे यायचाय. तोवर प्रसारमाध्यमांनी आपली ताकद जपून ठेवली पाहिजे.वाजपेयींच्या सरकारने २००४ साली इंडिया शायनिंग या नावाने निवडणुकीत प्रचार केला. लोकांना अंधारातला इंडिया पण माहीत होता. त्यामुळे तत्कालीन एनडीए आपटलं आणि यूपीएला सत्ता मिळाली. आता पुन्हा अच्छे दिन येऊ घातलेत. पण प्रसारमाध्यमांमध्ये ते कधीच आलेत. पॉझिटिव्ह बातम्या छापा, लोकांची दिवसाची सुरुवात चांगली झाली पाहिजे, असा धोषा मार्केटिंगवाल्यांनी जागतिकीकरणाच्या सुरुवातीपासून लावलाय. त्यामुळे पहिली पानं बातम्या न देता जाहिरातीच द्याव्यात, अशी एक महान कल्पना सर्व प्रसारमाध्यमांनी उचलून धरलीय. टीव्हीवाले सकाळी भविष्य सांगतात. ते सुद्धा छान छान असतं. त्यांना बिचाऱ्यांना ब्रेकिंग न्यूज द्यावी लागते. आधी त्यासाठी पळापळ करायला लागायची. पण आता फेसबुक, ट्विटरमुळे बातमीच तुमच्याकडे धावत येते. त्यामुळे सगळं तसं सोप्पं झालंय. दळण चोवीस तास दळायचं असलं तरी विचार चोवीस तास नसतो करायचा. समाजाचं सुमारीकरण किंवा निर्बुद्धीकरणच झालंय तितकं आणि मग अचानक एक दिवशी शीना बोरासारखं घबाड मिळतं. मग ते पुरवून पुरवून खायचं आठवडा-पंधरा दिवस. सगळं कसं एक्सक्लुझिव्ह, वेगवान. सगळ्याच्या पुढचं. या स्पर्धेत जिंकायचं, कारण त्याशिवाय धंद्याला बरकत नाही. हाच खेळ उद्या पुन्हा असं नेमाड्यांचा चांगदेव पाटील म्हणतो ते खरंच आहे. पात्रं बदलतात, खेळ तोच!