मुंबई : अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या तपासाची माहिती प्रतिज्ञापत्र करून सादर करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.याचा तपास सीबीआयकडे सोपवावा, यासाठी केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत सरकारतर्फे तपासाची माहिती तोंडी देण्यात आली. मात्र त्याच्या योग्यतेविषयी अर्जदाराच्या वकिलानेशंका उपस्थित केल्यावर सरकारला प्रतिज्ञापत्रावर माहिती देण्यास सांगण्यात आले.गेल्यावर्षी झालेल्या या हत्याकांडाने महाराष्ट्र सुन्न झाला होता. विविध संघटनांनी यातील आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन केले़ त्याचवेळी याचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी प्रोफेसर अनंत कदम, दीपक वाघमारे, प्रतीक कांबळे, सागर झेंडे व सुनील पवार यांनी याचिकेद्वारे केली होती़न्या़ व्ही़ एम़ कानडे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली़ त्यात याचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले असून, यातील आरोपीला पकडल्याचे शासनाने न्यायालयात सांगितले़ एखाद्या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी राज्याबाहेरील पोलिसांचे पथक नेमायला हवे़ या हत्याकांडाच्या तपासासाठी येथील पोलिसांचेच विशेष पथक नेमले़ त्यामुळे पारदर्शक तपास झाला असावा का, यावर प्रश्नचिन्हच आहे़ तसेच यातील आरोपी पकडणाऱ्या पोलिसांची नार्को टेस्ट झाली पाहिजे़ कारण याद्वारे या पोलिसांनी खरे आरोपी पकडले की नाही हे सिद्ध होईल, असा युक्तिवाद अॅड़ गुणरत्न यांनी केला़ उभय पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने वरील आदेश देऊन ही सुनावणी तहकूब केली़ (प्रतिनिधी)
जवखेडा हत्याकांड तपासाचे हायकोर्टास हवे प्रतिज्ञापत्र
By admin | Updated: February 3, 2015 01:30 IST