मुंबई : धुळे, नाशिक येथील सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडेंन्शिल डॉक्टर्स’ने (मार्ड) संप पुकारला आहे. मार्डने संपावर न जाण्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला देऊनही पुन्हा संप पुकारल्याने सामाजिक कार्यकर्ते आफाक मांडविया यांनी गेल्या वर्षी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती उच्च न्यायालयाकडे सोमवारी केली. त्यानुसार या याचिकेवर मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे मंगळवारी सुनावणी होणार आहे.गेल्या वर्षीही मार्डने संप पुकारल्याने सामान्य रुग्णांचे हाल झाले. काही रुग्ण दगावलेही. त्यामुळे डॉक्टरांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका आफक मांडविया यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारी रुग्णालयांत शस्त्रधारी पोलीस नेमण्याचे निर्देश दिले होते. तसेच सीसीटीव्ही बसवण्याचे व रुग्णाला एका वेळी दोनच नातेवाइकांना भेटण्याची परवानगी द्यावी, असेही निर्देश दिले. तर मार्डकडून भविष्यात कधीही संपावर न जाण्याची लेखी हमी घेतली होती. (प्रतिनिधी)
डॉक्टर संपाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी
By admin | Published: March 21, 2017 3:45 AM