कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कामकाजाच्या परीक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर तुम्ही परीक्षणासाठी नाही तर हवापालट आणि पर्यटनासाठी कोल्हापूरला आला आहात का?.असा आरोप करत विविध संघटनांनी आज शुक्रवारी न्याय विधि खात्याच्या अधिकाऱ्यांचेच परीक्षण केले. चौकशीचे किंवा कारवाईचे कोणतेच अधिकार नसतील तर तुम्ही आलातच का? असा प्रश्न करत समाधानकारक उत्तर न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी, ‘तुम्ही देवीच्या दारात आला आहात तिचा-भाविकांचा पैसा उधळून, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना, अधिकाऱ्यांना पाठीशी घालून पदरी पापच घेऊन जाणार आहात हे लक्षात ठेवा,’ असे खडे बोल सुनावले. शासनाच्या न्याय व विधि खात्याचे सहसचिव व्ही. जी. बिस्त, एफ. डी. जाधव, कक्ष अधिकारी सी. व्ही. सावंत, एन. के. कुदळ, मंत्रालयीन साहाय्यक श्रीकांत वाघमोडे, सुजित बोरकर हे अधिकारी बुधवारपासून देवस्थान समितीच्या परीक्षणासाठी कोल्हापुरात आले आहेत. पहिल्या दिवशी अंबाबाईचे दर्शनानंतर राधानगरी धरण गाठून तेथून ‘कोल्हापुरी पाहुणचार’ घेतल्याचे समजले होते. काल या अधिकाऱ्यांनी दिवसभर समितीच्या बलभीम बँक येथील कार्यालयात थांबून कागदपत्रांची पाहणी केली. आज सकाळी अकरा वाजता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी सदस्यांनी समितीला पूर्णवेळ अध्यक्ष आणि एक खजिनदार द्या, अशी मागणी केल्याचे प्रमोद पाटील यांनी सांगितले.या बैठकीनंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सुरेश पोवार, रामेश्वर पतकी, अॅड. विनायक रणखांबे यांच्यासह कार्यकर्त्यांनी समितीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. लाडू प्रसाद टेंडर, देवस्थानकडे दोन गाड्या आणि जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय गाडी असताना अध्यक्षांच्या सोयीसाठी नव्याने खरेदी केलेली इनोव्हा गाडी, गाड्यांचा गैरवापर, बॉक्साईट उत्खननाचा परवाना देण्यात झालेला भ्रष्टाचार ही सगळी प्रकरणे कागदपत्रांनिशी समितीसमोर मांडत तुम्ही संबंधित व्यक्तींवर काय कारवाई करणार, असे विचारले. त्यावर अधिकाऱ्यांनी आम्हाला कारवाईचे अधिकार नाहीत, असे सांगितले. कोणत्याच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न देऊ शकणाऱ्या या अधिकाऱ्यांनी समितीच्या कामकाजाची खोलवर तपासणी केली नाही हे स्पष्ट जाणवत होते. यावेळी ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांनी समितीच्या अधिकाऱ्यांसमोर गेल्या दोन वर्षांत झालेले गैरव्यवहार, गायब झालेली चांदी, विद्यमान अध्यक्ष ,माजी सचिव, सहसचिवांनी व मागील सदस्यांनी केलेले सर्व बेकायदेशीर व्यवहार, ‘लेसर शो’च्या नावाखाली माजी अध्यक्ष देशमुख यांनी खर्च केलेले साडेचार लाख रुपये आदी माहिती पुराव्यांनिशी मांडली. सर्व वादग्रस्त प्रकरणांवर सदस्य म्हणून तुमचा काही खुलासा असल्यास तो द्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे सदस्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शासनाच्या अखत्यारित असलेल्या देवस्थानांचे दरवर्षी परीक्षण केले जाते. त्यासाठी आम्ही कोल्हापुरात आलो आहोत. तपासणी म्हणून नाही तर हे रूटिन कामकाज आहे. हे परीक्षण आणि नागरिकांनी मांडलेले मुद्दे विचारात घेऊन आम्ही आमचा अहवाल प्रधान सचिवांना व त्यानंतर मुख्यमंत्र्यांना सादर करू. - व्ही. जी. बिस्त (सहसचिव, न्याय विधि खाते)
तुम्ही हवापालटासाठी कोल्हापुरात आलाय काय ?
By admin | Updated: November 22, 2014 00:37 IST