सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात कोणाला उभे करायचे असेल त्याला करा. विक्रमी मताधिक्याने माझा विजय झाला नाही, तर मी कायमचे राजकारण सोडून देईन आणि जर विजयी झालो, तर संजय पाटलांनी अपघाताने व लाटेवर मिळालेली खासदारकी सोडावी, असे आव्हान आज (सोमवारी) गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात दिले. सांगलीच्या पोलीस मुख्यालय परिसरातील सभागृहात राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा झाला. यावेळी आर. आर. पाटील यांनी खासदार संजय पाटील यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या व वाटेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे काही नेते वाऱ्याबरोबर पाठ फिरवत आहेत. काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, काहीजण गेल्यात जमा आहेत, तर काहींनी नुसत्याच गाठीभेटी केल्या आहेत. या सर्वांना माझा सल्ला आहे की, त्यांनी लवकरात लवकर निघून जावे. अशा कोणत्याही नेत्याबरोबर चर्चा करण्याची आमची तयारी नाही. ज्यांचा निष्ठेशी, विचारांशी संबंध नाही, असे लोक पक्षातून गेल्याने काहीच फरक पडणार नाही. तालुकास्तरावर काम करणाऱ्या अनेक नेत्यांना दिवसा आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. अशा नेत्यांच्या पक्षप्रवेशाला आणि त्यांना समावून घेणाऱ्या महायुतीला आमच्या शुभेच्छा आहेत. इतके दिवस आम्ही त्यांना सहन केले, आता महायुतीने त्यांचा अनुभव घेऊन पहावा. आम्ही जे सोसले आहे, ते त्यांना कितपत सोसणार, हासुद्धा प्रश्न आहे. त्या-त्या तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हीच संधी मानली पाहिजे. आम्ही नेत्यांच्या जागी उसना उमेदवार आणण्याऐवजी कार्यकर्त्यांनाच नेते बनवू. त्यामुळे अशा नेत्यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीला काहीही फरक पडणार नाही. धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी जतमधील प्रकाश शेंडगेंनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना आमदारकी मिळाली, पण धनगर समाजाला काय मिळाले, याचा विचार समाजाने करावा. (प्रतिनिधी)देवेंद्र फडणवीसांचे दिवास्वप्नकेंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर आता राज्यात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचे दिवास्वप्न पडत आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांची परंपरा आणि पुण्याई अजून संपलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र दिन साजरा न करणाऱ्या पक्षाची व कोत्या मनोवृत्तीच्या लोकांची सत्ता येथे येऊ शकत नाही, अशी टीका गृहमंत्री पाटील यांनी केली. ...तर राष्ट्रवादीचे शेट्टींच्या घरावर मोर्चेकेंद्रात आघाडी सरकार असताना शेतीमालाच्या आधारभूत किमतीत वाढ झाली नाही, म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलने केली. आता महायुतीच्या शासनाने शेतीमालाच्या आधारभूत किमतीबाबत आघाडीपेक्षाही वाईट भूमिका घेतली आहे, तरी शेट्टी गप्प आहेत. त्यांची बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे की महायुतीशी?, असा सवाल गृहमंत्री पाटील यांनी उपस्थित केला. शेतीमालाविषयी आता केंद्र शासनाची अशीच नियत राहिली, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेट्टी व स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांच्या घरावर मोर्चे काढतील, असा इशाराही त्यांनी दिला.
हरलो तर राजकारण सोडेन : आर.आर.
By admin | Updated: August 11, 2014 22:41 IST