मुंबई: दिवाळीच्या रोशनाईने मुंबापुरी सजलेली असताना दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी थेट आदिवासी पाडा गाठला. दिवाळीचा आनंद आदिवासी मुलांसोबत साजरा करत या सणाचा आनंद विद्यार्थ्यांनी द्विगुणित केला.परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयाचे एन.एस.एस. युनिट दरवर्षी आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन दिवाळी साजरी करते. यंदाही या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्ह्यातील धामणगाव आणि तारवाडी येथील आदिवासी गावांना भेट दिली. विद्यार्थी आणि शिक्षकांनी गावकऱ्यांच्या मदतीने गावातच फराळ तयार केला आणि तयार फराळाचा आनंद साऱ्यांनी एकत्र लुटला. यावेळी फराळासोबत फटाके, आकाशकंदील, उटणे यांचे वाटप करण्यात आले. येथील शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे सणासोबतच सामाजिक भान राखत स्वच्छतेचे महत्त्व कळावे, यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.शिवाय महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटच्या वतीने या आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना ‘स्वप्नपूर्ती’ या उपक्रमांतर्गत शिकविले जाते. या विद्यार्थ्यांनाही शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी एन.एस.एस. युनिटचे कार्यक्रम अधिकारी बी.टी. निकम आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
आदिवासी पाड्यात दिवाळीचा आनंद
By admin | Updated: October 31, 2016 02:07 IST