मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गोविंदांकडून नाराजीचा सूर उमटत आहे. मात्र असे असतानाही दहीहंडी उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज झालेली पाहावयास मिळते. या फॅशन दुनियेतील दहीहंडीत तरुणाई हेअर स्टाईलवर कान्हा साकारत असल्याने दहीहंडी उत्सवाचा नवा ट्रेंड या वेळी पाहावयास मिळाला.ढाक्कुमाकूमच्या तालावर नाचणाऱ्या तरुणाईने थरावर थर रचण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे काही गोविंदांनी लोअर परळच्या हेअर स्टायलिस्ट सागर मोरे याच्या सलूनमध्ये गर्दी केली. बाहेर पडणाऱ्या गोविंदांवर सर्वांच्याच नजरा खिळत होत्या. मात्र फॅशन दुनियेत नेहमीच काही तरी वेगळे करण्याची धडपड करणारी ही मंडळी दहीहंडी उत्सवासाठी हेअर स्टाईलच्या माध्यमातून कृष्णाची वेगवेगळी रूपे साकारत होती. हटके दिसण्यासाठी त्यांची ही धडपड सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे होते. येथे येणाऱ्या गोविंदांनी कृष्णाच्या विविध रूपांत हेअर स्टाईल केली. मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी काही तरी वेगळे हवे अशी तरुणाईची मागणी असते. या वेळी दहीहंडी उत्सवानिमित्त त्यांनी दहीहंडीशी निगडित हेअर स्टाईल करून देण्यास सांगितले. त्यानुसार तयारी करण्यास सुरुवात केली. यापूर्वी अनेक हेअर स्टाईल केल्या आहेत. मात्र यंदा कृष्णाची वेगवेगळी रूपे साकारण्याची मागणी जास्त होती. त्यानुसार, हेअर स्टाईल करत गेलो. तर काहींनी दाढीमध्येही पान, हंडीची डिझाइन करून घेतली होती. तर केसांवरही कृष्णापासून बांधलेली दहीहंडीची हेअर स्टाईल या वेळी केली. त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवात तरुणाईचा अनोखा टे्रंड मुंबईकरांना पाहावयास मिळणार आहे. (प्रतिनिधी)
हेअर स्टाईल ‘कान्हा’ची
By admin | Updated: August 25, 2016 02:05 IST