कारंजा (वाशिम): लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिराच्या देणगीत कोट्यवधी रूपयांची अफरातफर झाल्याचा प्रकार रविवारी उजेडात आला. जवळपास ३६ कोटी रूपयांचा हा अपहार असून, याप्रकरणी कारंजा पोलिसांनी मंदिराच्या विश्वस्तांसह नऊ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने गुरूभक्तांमध्ये खळबळ उडाली आहे. कारंजा येथील शेखर पुरूषोत्तम काण्णव यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिराच्या विश्वस्तांनी सन २000 ते २00१ आणि २0१0 ते २0११ या काळात संगनमत करून संस्थानला देणगी स्वरूपात मिळालेल्या पैशांचा बनावट अहवाल तयार केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयात बनावट दस्तऐवज दाखल करून ३६ कोटी ३७ लाख ७९ हजार ८३३ रूपयांची अफरातफर केल्याचा दावाही तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. या तक्रारीनुसार कारंजा शहर पोलिसांनी विश्वस्त नारायण गणपत खेडकर (८0), वसंत महादेव सस्तकर (७७), उमाकांत पुरूषोत्तम पांडे (७0), दिगांबर राजाराम बर्डे (८0), विनायक दिगांबर सोनटक्के (६५), श्रीपाद यशवंत परळीकर आणि प्रकाश वसंत घुडे (सर्व रा.कारंजा), संस्थानचे लेखा परिक्षक सुभाष विनायक मुंगे तसेच अमरावती येथील लेखा परिक्षक संजय एस.खांडेकर यांच्याविरूद्ध कलम ४२0, ४६५, ४६८, ४0८, ४७0 अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, मंदिराच्या व्यवहारासंदर्भात काण्णव यांनी यापूवीर्ही तक्रार केली होती. ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे यासंदर्भात मत व्यक्त करणे उचित ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया गुरुमंदीर संस्थानच्या विश्वस्तांनी व्यक्त केली.
कारंजातील गुरूमंदिराच्या देणगीत ३६ कोटींचा अपहार
By admin | Updated: June 1, 2015 02:08 IST