मुंबई : काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदाकरिता माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील या दोन परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरस आहे. आज झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गटनेता निवडीचे सर्वाधिकार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्यात आले. त्यामुळे आता केवळ गटनेत्याच्या नावाची शुक्रवारी दिल्लीहून घोषणा होण्याची औपचारिकता बाकी आहे.काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदाच्या निवडीकरिता केंद्रीय नेतृत्वाने लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि प्रभारी मोहन प्रकाश यांना धाडले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला ४२पैकी ३९ आमदार उपस्थित होते. सुरूपसिंग नाईक, कालिदास कोळंबकर हे प्रकृतीच्या कारणास्तव तर नसीम खान हे वैयक्तिक कारणास्तव गैरहजर होते. बैठक सुरू होताच सुनील केदार व अन्य काही आमदार उभे राहिले व त्यांनी बोलण्याची परवानगी मागितली. मात्र बैठकीत जाहीरपणे मतप्रदर्शन न करता निरीक्षक प्रत्येक आमदाराचे मत जाणून घेतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे जाहीरपणे कोणालाही मतप्रदर्शन करता आले नाही. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदाकरिता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही उत्सुक होते. मात्र चव्हाण यांच्या निवडीला पक्षातून विरोध केला जाण्याची दाट शक्यता दिसू लागताच आपण गटनेतेपदाच्या शर्यतीत नाही, असे चव्हाण यांनी जाहीर केले. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लक्ष्यखरगे व मोहन प्रकाश यांच्याकडे काही आमदारांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यशैलीबाबत व पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली, असे कळते. आमदार नाराजी व्यक्त करतील म्हणून विधिमंडळ पक्षाच्या बैठका घेण्याचे टाळण्यात आले. काँग्रेस सत्तेत असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही सापत्न वागणूक दिली गेली, अशा तक्रारी काही आमदारांनी केल्याचे समजते. निवडणुकीत पक्षाकडून पुरेशी मदत मिळाली नाही, असा सूर काही आमदारांनी लावला. नवा नेता आक्रमक हवा, अशी भावना काहींनी व्यक्त केल्याचे समजते.थोरात-विखे यांच्यात चुरसविधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदाकरिता बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे-पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. थोरात यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. शिवाय, पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही थोरात यांच्याशी कालच चर्चा केली होती. तरुण नेतृत्वाकडे ही धुरा सोपवायचे झाल्यास अमित देशमुख, सुनील केदार अथवा यशोमती ठाकूर यांची नावे चर्चेत आहेत, असे बोलले जाते.
गटनेतेपद : थोरात-विखे यांच्यात चुरस
By admin | Updated: November 7, 2014 05:00 IST