वाडा : तालुका हा ‘डी प्लस’ झोन असून या विभागात वीजेचे अनुदान हे फक्त २० पैसे प्रति युनिट असून इतर विभागासाठी ते मराठवाडा १ रूपये २० पैसे तर विदर्भासाठी १ रूपये ४० पैसे आहे. ही तफावत दूर व्हावी आणि विदर्भाप्रमाणे वाड्यातील वीज अनुदान वाढवावे अशी मागणी मनसेने आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांना निवेदन देऊन केली आहे. तालुक्यात ‘डी प्लस’ झोनमुळे औद्योगिकरण वाढले असून त्यातून रोजगार निर्माण होत आहे. पूर्वी विजेचे अनुदान वाडा विभागात जास्त होते. मात्र आता हे अनुदान कमी झाल्याने येथील उद्योगही बंद पडत आहेत किंवा स्थलांतरीत होत आहेत. वीजेचे दर परवडत नसल्याने सुमारे ३० ते ४० टक्के कारखानदारांनी आपले कारखाने बंद केले आहेत. या धोरणामुळे येथील लोखंड बनविणारे कारखाने बंद झाले आहेत. या बंद होत असलेल्या कारखान्यांमुळे बेरोजगारी निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्यावतीने पालकमंत्र्याना हे निवेदन दिले गेले आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील, सरचिटणीस देवेंद्र भानुशाली, कांतीलाल ठाकरे, सुरेश कोम, दिपक ठाकरे आदी कार्यकत्यानीं सवरा यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली आहे. (वार्ताहर)
वीजेचे अनुदान करा १.४० पैसे
By admin | Updated: July 20, 2016 03:53 IST