- शरद कद्रेकर
दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र सरकारने घेतला खरा, पण त्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. ‘लटकलेला गोविंदा सुटला’ असं म्हटलं जात असलं तरी गोविंदा लटकलेलाच दिसतो आहे. मानवी मनोरे रचण्याच्या उत्सावाला साहसी खेळाचा दर्जा देण्याच्या निर्णयास सरकारने घाईच केली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मुंबई, ठाण्यातील विविध गोविंदा पथकांची तसेच राजकीय पक्षांची धुसफुसही यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवते. ठाण्यातील सुजाण नागरिकांनी ‘संघर्ष’ दहीहंडी यंदा होणार नसल्यामुळे शांततामय जल्लोष केला. ठाण्यातील हे लोण मुंबापुरीत कितपत पोहोचलं ते आठवडाभरात स्पष्ट होईल.महाराष्ट्राचे २0१२ मध्ये क्रीडा धोरण तयार करण्यात आले असून, त्यातील तरतुदींनुसार गोविंदा या मानवी मनोरे रचण्याच्या प्रकारास साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने समिती नियुक्त केली. या समितीच्या अहवालातील शिफारशींवर क्रीडा, विधी व न्याय, बाल हक्क विभागांशी चर्चा करून सरकारने हा निर्णय घेतला. १२ वर्षांखालील मुलांना या खेळात सहभागी होता येणार नाही. १२ ते १५ वयोगटातील मुले सहभागी झाल्यास त्यांच्या पालकांकडून त्याबाबतचे संमतीपत्र भरून घेणे बंधनकारक असेल. साहसी खेळाचा दर्जा देण्यात आलेल्या या खेळात सहभागी होणाऱ्यांना उंचीचे कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. मात्र त्यांना ज्या अटी असतील त्या पाळाव्या लागतील. नियमांचे उल्लंघन केल्यास त्याची जबाबदारी क्रीडा विभागावर नसेल. संबंधित विभागाच्या माध्यमातून योग्य ती कारवाई करण्यात येईल. गोविंदासाठी हेल्मेट, सेफ्टी हार्मेस, मॅट्स, डॉक्टर्स, रुग्णवाहिका आदी सुरक्षाविषयक उपाययोजना बंधनकारक राहणार आहेत.दहीहंडी आठवड्यावर आली असताना दहीहंडी पथकांचा सराव सुरू आहे. गेल्यावर्षी १२ वर्षांखालील बालगोविंदांना या खेळातील सहभागावर बंदी घालण्याचा निर्णय बाल हक्क आयोगाने घेतला होता. परंतु सरावाची सबब पुढे करीत मंडळांनी विरोध केला. यंदा मात्र सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला. तसेच न्यायालयाच्या निकषांप्रमाणे दहीहंडीच्या उंचीवर निर्बंध आणले. सरकारच्या या अटीचे पालन कितपत होते ते बघायचे. विविध मंडळांमध्ये नियमांबाबत नाराजीचा सूर असला तरी आपल्यावर कारवाई होऊ नये, यासाठी मंडळ दक्षता बाळगतील अशी आशा आहे. ९0च्या दशकानंतर दहीहंडीचे स्वरूप पालटले. मानवी मनोऱ्यांचे उंच उंच थर लावून दहीहंडी फोडणाऱ्यांची जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. प्रायोजकांच्या आक्रमणामुळे बक्षिसांची रक्कम फुगली. शेकडो, हजारोंच्या घरातील बक्षिसे लाखोंमध्ये (कागदोपत्री) गेली. पूर्वी गोविंदांमध्ये रथांवर देखावे असत. कर्णकर्कश गोंगाट नसे. परंतु अलीकडे गोविंदा ट्रक तसेच टू-व्हीलरचा सर्रास वापर करतात. यासोबत कानठळ्या बसवणारा डीजे असतोच, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन तर होतेच तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक, रुग्णांची गैरसोय होते. कामाचा ताण असलेल्या पोलीस दलावर दडपण तर येतेच. आणि केवळ बघ्याचीच भूमिका त्यांना वठवावी लागते.