सर्वोच्च न्यायालयाकडून लोकशाही बहाल
ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. १४ - दिवंगत काँग्रेस नेते शंकरराव चव्हाण यांनी राज्य अन् देशात मोठी पदे सांभाळली़ त्यांनी आयुष्यभर संवैधानिक मुल्यांचे संरक्षण केले. विद्यमान भाजपा सरकारने मात्र सत्तेच्या लालसेपोटी अरुणाचल प्रदेश, उत्तराखंडमधील लोकशाही मूल्य पायदळी तुडवित राज्यघटनेचा अवमान केला, अशी घणाघाती टीका करीत काँग्रेस अध्यक्ष खा़. सोनिया गांधी यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला़ डॉ़. शंकरराव चव्हाण यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच स्मृती संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या़. अध्यक्षस्थानी माजी पंतप्रधान डॉ़. मनमोहनसिंग होते़. यावेळी काँग्रेस अध्यक्ष खा़. सोनिया गांधी म्हणाल्या, काँग्रेस नेतृत्वाची उज्ज्वल परंपरा हे त्यातीलच अग्रणी राहिलेले. डॉ़. शंकरराव यांनी दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविले़ केंद्रात गृहमंत्री व अन्य महत्त्वाची पदे सांभाळली़. ते कधीही संवैधानिक मुल्यांच्या बाहेर जावून काम करण्याचा विचारही करू शकत नव्हते. लोकमताचा आदर करीत सर्वसामान्य माणसांसाठी त्यांनी आयुष्य वेचले, आज मात्र सत्ता मिळविण्यासाठी राज्यघटना बाजूला सारण्यापर्यंत मजल जात आहे. आज शंकरराव असते तर त्यांना मोठे दु:ख झाले असते, त्यांनी अशा असंवैधानिक राजकारणाचा कठोरपणे विरोध केला असता. निश्चितच आजच्या परिस्थितीत आपणा सर्वांना सर्वोच्च न्यायालयाचा अभिमान वाटला पाहिजे़ न्यायालयाने घटनेचे संरक्षण केले अन् लोकशाही बहाल केली़.शंकरराव चव्हाण यांचे आपल्या मातृभूमीवर, मराठवाड्यावर प्रेम होते़ परंतु ते जेव्हा विधिमंडळात जात, तेव्हा ते संपूर्ण महाराष्ट्राबद्दल बोलत असत़ संसदेत जात तेव्हा संपूर्ण देशाबद्दल बोलत असत़ अजूनही त्यांच्या कर्तृत्वाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे़ शिस्तीबद्दल त्यांना हेडमास्तर म्हटले जायचे़. विद्यार्थीदशेपासून सामाजिक जाण आणि भान असलेले शंकरराव राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले़ कुठल्याही कामाची सुरुवात केली की ते यशस्वीपणे शेवटपर्यंत नेण्याचा त्यांचा ध्यास असत़ त्यामुळेच ते इंदिरा गांधींचे विश्वासपात्र राहिले़ ज्यावेळी राजीव गांधी यांच्याकडे देशाचे नेतृत्व आले, त्यावेळी अनेक समस्या उभ्या होत्या़ आसाम, मिझोराम, पंजाबमध्ये कडवी आव्हाने होती़ त्यावेळी शंकरराव चव्हाण यांनी देशात शांतता बहाल करण्यासाठी मोठे योगदान दिले़ मोदी सरकार व राज्यातील सरकारवर टीका करताना सोनिया गांधी म्हणाल्या, शेतकऱ्यांप्रती शंकरराव चव्हाण यांची कटीबद्धता होती़ त्यांनी सिंचनाच्या योजना आणल्या़ सहकार क्षेत्रामध्ये योगदान दिले़ शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था मजबूत केल्या़ मात्र मोदी सरकार व राज्यातील सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आठवण करून द्यावी लागते़ दुष्काळाबद्दल बोलावे लागते़ तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी युपीए सरकारमध्ये शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासी यांच्यासाठी ज्या कल्याणकारी योजना राबविल्या, त्या आज कमजोर केल्या जात आहेत़ ज्यामुळे लाखो गरजू लोकांना नुकसान सहन करावे लागत आहे़ एकीकडे उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले जात आहे़ अन् शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले जात आहे़ शेतकरी, शेतमजुरांची ही हेळसांड काँग्रेस कदापि सहन करणार नाही़ सरकारला वेळोवेळी जाब विचारू, असेही त्या म्हणाल्या़ अध्यक्षीय भाषण करताना माजी पंतप्रधान डॉ़मनमोहनसिंग म्हणाले, नियोजन आयोगामध्ये काम करताना डॉ़शंकरराव चव्हाण यांनी मोठे योगदान दिले़ त्यांचे विचार पुढे नेणे व अपूर्ण काम पूर्ण करणे हीच त्यांच्याप्रती आदरांजली ठरेल, असेही डॉ़मनमोहनसिंग म्हणाले़ प्रारंभी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले़ मंचावर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री डॉ़शिवाजीराव निलंगेकर, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, पक्षनिरीक्षक मोहन प्रकाश, माणिकराव ठाकरे, माजीमंत्री पतंगराव कदम, दिलीपराव देशमुख, हर्षवर्धन पाटील, मुकुल वासनिक, खा़राजीव सातव, संजय निरुपम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, विकास कारखान्याचे अध्यक्ष वैशालीताई विलासराव देशमुख, आ.अमित देशमुख, शैलेष पाटील चाकूरकर, आ. डी़पी़ सावंत, आ. अमिता चव्हाण, आ. अमरनाथ राजूरकर, आ. वसंतराव चव्हाण आदींची उपस्थिती होती़.