आर.एन. मकारू : अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्स नागपूरतर्फे मेगा सीएमईनागपूर : ‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे प्रत्येक रक्तपेढीचे ब्रीद आहे. मात्र आजही बहुसंख्य रक्तपेढ्या विशेषत: महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमधील रक्तपेढ्या या ब्रीद वाक्यांना घेऊन कार्य करीत नसल्याचे चित्र आहे. रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली जगातील सर्वात अत्याधुनिक नॅट (न्यूलिक अॅसिड अॅम्पलिफिकेशन टेक्नॉलॉजी) तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या तंत्रज्ञानामुळे सुरिक्षत रक्त मिळण्याची शाश्वती मिळत असताना, आजही शासकीय रक्तपेढ्यांमध्ये जुनाट ‘एलायजा’ चाचणी केलेले रक्त रुग्णांना दिले जात आहे. ही गंभीर बाब आहे, असे मत नवी दिल्लीच्या अपोलो इस्पितळाचे संक्रमण औषध विभागाचे सल्लागार संचालक डॉ. आर.एन. मकारू यांनी व्यक्त केले. मेडिकल सायन्स अकॅडमी आॅफ नागपूरतर्फे ‘ट्रान्सफ्युजन मेडिसीन (ब्लड बॅकिंग)’ या विषयावर ‘मेगा सीएमई’चे (मोठ्या वैद्यकीय निरंतर शिक्षण कार्यक्रम) रविवारी हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. डॉ. मकारू म्हणाले, एखादा विषाणू रक्तदात्याच्या शरीरात सुप्तावस्थेत असेल तर त्या विषाणूंचा प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिकारके निर्माण होतात. या प्रतिकारकांचा शोध घेऊन या विषाणूंचे अस्तित्व ओळखण्याचे काम ‘एलायजा’ पद्धतीने केले जाते. मात्र ही प्रतिकारके शरीरात तयार होण्यासाठी काही कालावधी (विंडो पिरियड) लागतो. या काळात एलायजा पद्धतीने विषाणूंचे अस्तित्व ओळखता येऊ शकत नाही, असे विषाणू न ओळखता आलेले रक्त अथवा रक्त घटक रु ग्णाला दिले गेल्यास तो रु ग्ण त्या त्या संसर्गाने उदा. एचआयव्ही, कावीळ यांच्यासह अन्य विषाणूजन्य रोगाने बाधित होऊ शकतो. नॅट टेस्ट तंत्रज्ञान ‘विंडो पिरियड’ कमी करीत असल्याने विषाणूंची बाधेची शक्यता अनेक पटींनी कमी करता येते. रक्त संक्र मणादरम्यान सुरिक्षत रक्ताचे महत्त्व लक्षात घेऊन रुग्णांनी नॅट टेस्टेड रक्ताला प्राधान्य देणे आवश्यक झाले आहेयावेळी डॉ. ए.के.गंजू आणि डॉ. ललित राऊत यांनी विविध विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव, रक्त बँकिंग, लहान मुलांमधील रक्त संक्रमण आदी विषयांवर पॅनल चर्चा करण्यात आली. ही चर्चा डॉ. हरीश वरभे यांनी घडवून आणली. उपस्थितांचे स्वागत डॉ. सुनील अंबुलकर यांनी केले. या सीएमईचे संयोजक डॉ. राधा मुंजे, डॉ. अनुजा सगदेव, डॉ. आशिष खंडेलवाल हे होते. या कार्यक्रमाचे आयोजन नागपुरातील आठ वैद्यकीय संघटनांनी मिळून केले होते. (प्रतिनिधी)सिकलसेल, थॅलेसेमियाच्या रुग्णांना योग्य रक्त मिळणे आवश्यकमुंबईच्या पॉल हिंदुजा हॉस्पिटलच्या संक्रमण औषध विभागाचे सल्लागार डॉ. राजेश सावंत म्हणाले, ज्या रुग्णाला वारंवार रक्ताची गरज पडते अशा रुग्णाच्या रक्ताच्या ३० वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी करून त्याच्याशी साम्य असलेल्या रक्तदात्याचेच रक्त त्या रुग्णाला देणे आवश्यक आहे. असे झाल्यास रुग्णाला भविष्यात संभावणारे धोके कमी होतात. हिंदुजा इस्पितळातून याची सुरुवात झाली आहे. १०० रक्तदात्यामधून ८० रक्तदात्यांमध्ये रुग्णाशी जुळणारे हे साम्य आढळून येते. विशेषत: सिकलसेल, थॅलेसेमिया, कर्करोग व गर्भवती स्त्रियांसाठी ही पद्धत वापरणे आवश्यक आहे.
शासकीय रक्तपेढ्यांमध्ये नॅट तंत्रज्ञान गरजेचे
By admin | Updated: December 22, 2014 00:40 IST