सुधीर लंके, पुणेसहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके शिक्षण विभागाने रोखली आहेत. विशेष म्हणजे अभ्यासक्रमाबाबतच्या निर्णयाचे अधिकार असलेल्या शैक्षणिक व संशोधन परिषदेला अंधारात ठेवून, या बदलाचा निर्णय केवळ बालभारती व मंत्रालय पातळीवरून झाल्याचे समजते.राज्य सरकारने पहिली ते आठवीसाठी २०१२ मध्ये पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम तयार केला आहे. अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणीचे धोरणही ठरलेले आहे. चालू शैक्षणिक वर्षापर्यंत या वेळापत्रकाची ठरल्याप्रमाणे अंमलबजावणी झाली. आता नव्या शैक्षणिक वर्षात पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तके मिळायला हवीत. परंतु, शालेय शिक्षण विभागाने सहावीचा जुनाच अभ्यासक्रम सुरू ठेवून, या वर्षी केवळ पाचवीची नवीन पुस्तके छापण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे, बालभारतीने पाठविलेल्या प्रस्तावानुसारच हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. विशेष म्हणजे शिक्षणमंत्री हेच बालभारतीचे अध्यक्ष आहेत. अभ्यासक्रम बदलण्याच्या निर्णयाचा अधिकार राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेला (एससीईआरटी) आहे. बालभारतीकडे केवळ पुस्तक निर्मितीचे काम असते. मात्र, ‘एससीईआरटी’ला सहावीची नवीन पुस्तके का रोखण्यात आली, याबाबतची काहीही कल्पना नसल्याचे या विभागाकडून समजले.
सहावीची पुस्तके सरकारने रोखली !
By admin | Updated: February 12, 2015 02:55 IST