कर्जत : एखाद्या शेतकऱ्याने एखादे झाड तोडले की त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावणाऱ्या वन विभागाने रेल्वेला मात्र खास वागणूक दिली आहे. माथेरान मिनीट्रेन मार्गावरील अमनलॉज स्थानकात रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात झाडे तोडली आहेत, मात्र याचा साधा पंचनामा करायलाही वन विभागाला वेळ नाही. माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे. तेथे कोणतेही झाड तोडण्यास परवानगी नाही. तर असे कृत्य केले की वन विभाग मोठी कारवाई करण्यासाठी लगेच पावले उचलतो. त्यामुळे माथेरानमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे कधी कधी त्रासदायक ठरते. वन विभाग आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येते. पण माथेरान मिनीट्रेनच्या अमनलॉज रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासनाने संपूर्ण परिसर वृक्षमुक्त केला आहे. ही झाडे तोडण्यासाठी रेल्वेने वन विभागाकडे परवानगी मागितली होती, मात्र किती झाडे तोडणार, त्यातील किती मौल्यवान आहेत, कोणती झाडे महत्वाची आहेत याबाबत वन विभागाला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. कोणतीही लेखी परवानगी न घेता अनेक झाडे रेल्वेने तोडून टाकली आहेत. त्यामुळे अमन लॉज परिसर आता भकास वाटू लागला आहे. (वार्ताहर)
अमन लॉजजवळ बेसुमार वृक्षतोड
By admin | Updated: January 31, 2015 05:17 IST