पंढरपूर : महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून वाचव, पाऊस पडू दे, पेरण्या होऊ दे आणि बळीराजाची मेहनत यशस्वी होऊ दे, अशी प्रार्थना राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पंढरपुरात श्री विठ्ठलचरणी केली.
आषाढी एकादशीची शासकीय महापूजा बुधवारी पहाटे चार वाजता पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या पत्नी सत्त्वशीला यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसोबत श्री विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान वारकरी राम शेळके, त्यांच्या पत्नी प्रमिला व मुलगा संगमेश्वर यांना मिळाला. शेळके हे नंदीबिजलगाव (ता. औराद, जि. बीदर) येथील आहेत.
वारीला अनेक वर्षाची परंपरा असून पूजा करण्याचा मान मिळाला, हे माङो भाग्य समजतो. आषाढी वारीला आल्याबरोबर पावसाने सुरुवात केली. अवघ्या महाराष्ट्रात पाऊस सुरू असल्याचे रिपोर्ट आले. तमाम जनतेला सुख मिळावे व भरभराट होण्यासाठी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पालकमंत्री दिलीप सोपल, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे व इतर मान्यवर उपस्थित होते. ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात गो-हत्याबंदी कायदा झाला असला तरी सर्व समाजाशी चर्चा करून येत्या 15 दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजेचा मान मिळालेल्या वारकरी शेळके कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी विठ्ठलाची सपत्नीक महापूजा करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पूजेचा मान मिळालेले वारकरी राम शेळके, प्रमिला शेळके, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे, प्रकाश पाटील आदी.
‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी गर्दी
नेवासा : संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिरातील ‘पैस’ खांबाचे बुधवारी आषाढी एकादशीच्या पाश्र्वभूमीवर भाविकांनी दर्शन घेतले. पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली होती.