नवी मुंबई : आईचा बदला घेण्यासाठी तिच्या सहा वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची बाब पुढे आली आहे. कोपरखैरणो येथे 29 ऑगस्ट रोजी लहान मुलीवर बलात्काराची ही घटना घडली होती. याप्रकरणी अटक आरोपीने पोलिसांना सुडापोटी आपण हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.
कोपरखैरणो सेक्टर 19 येथे झोपडपट्टी भागात ही घटना घडली होती. खाण्यामध्ये गुंगीचे औषध देऊन या मुलीवर बलात्कार झाला होता. मात्र त्यानंतर सदर मुलगी बेशुध्द अवस्थेत गेल्याने प्रकरणाच्या तपासाचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले होते. अखेर मुलगी राहत असलेल्या परिसरातूनच अफाजुद्दीन शेख (53) याला अटक करण्यात आली होती. अधिक तपासात शेख याने मुलीच्या आईचा सूड घेण्यासाठी मुलीवर बलात्कार केल्याची कबुली दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांनी सांगितले. शेख हा मुलीच्या कुटुंबीयांच्या परिचयाचा होता. काही दिवसांपूर्वी त्याचे या मुलीच्या आईसोबत भांडण झाले होते. त्यामध्ये मुलीच्या आईने शेख याला परिसरातील इतर व्यक्तींसमोर खडसावले होते. त्याचाच राग येऊन सुडाची भावना शेख याच्या मनात निर्माण झाली होती. अखेर 29 ऑगस्ट रोजी त्याला ही सहा वर्षाची मुलगी एकटी खेळत असल्याचे दिसले. त्याने या मुलीला आपल्या घरात बोलावून गुंगीचे औषध मिसळलेले अन्न खायला देवून तिच्यावर बलात्कार केला होता. परंतु हे कृत्य करुन मूळ गावी कोलकाता येथे तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली. (प्रतिनिधी)