पुणे : शहराचा कचरा प्रश्न सोडविण्यासाठी पुढील वर्षभर मी स्वत: त्यामध्ये सातत्याने लक्ष घालणार आहे. शहरात प्रभागनिहाय छोटे कचरा प्रकल्प उभारण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी दिले.महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्र.३९ मध्ये उभारण्यात आलेल्या १५ टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी महापौर प्रशांत जगताप, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, उपमहापौर मुकारी अलगुडे, नगरसेवक गणेश बिडकर, नगरसेविका सोनम झेंडे उपस्थित होते. बापट म्हणाले, ‘‘महापालिकेच्या वतीने आजुबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना मागील वर्षी १ लाख २० हजार टन ओला कचरा शेतीसाठी उपलब्ध करून दिला होता. या वर्षभरात शेतीसाठी २ लाख टन ओला कचरा उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. कचऱ्याची मोठी समस्या आहे. प्रभागातील कचरा प्रभागात जिरविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी प्रभागांमध्ये ५ ते ५० टन क्षमतेचे प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहेत. पुढील वर्षभरात असे २५ प्रकल्प शहरात कार्यन्वित केले जातील. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये या प्रकल्पासाठी जागा मिळविण्यासाठी ३ वर्षे पाठपुरावा केला. प्रभागात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापेक्षा या प्रकल्पाची क्षमता जास्त आहे. लवकरच येथे प्लॅस्टिकपासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे, असे गणेश बिडकर यांनी सांगितले. दोन हजार चौरस फूट जागेवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. ओला कचऱ्यावर मायक्रो आॅर्गेनिजम पद्धतीने प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जाणार आहे. यासाठी बंदिस्त शेड उभारण्यात आले आहे. या ठिकाणी मायक्रो आॅर्गेनिजम बेस्ड कंपोस्ट मशीन, क्रशिंग, लिफ्टिंग सिस्टिम बसविन्यात आली आहे. या ठिकाणी दररोज १० टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी १ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.दिलीप कांबळे, अनिल शिरोळे यांनी या वेळी विचार मांडले. प्रशांत जगताप यांनी प्रास्ताविक केले तर नगरसेविका सोनम झेंडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
छोट्या कचरा प्रकल्पांसाठी निधी देणार - गिरीश बापट
By admin | Updated: July 11, 2016 01:29 IST