कमलाकर कांबळे,
नवी मुंबई- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बेकायदा बांधकाम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. विशेष म्हणजे शहरातील बेकायदा बांधकामांत बहुतांशी आजी-माजी नगरसेवकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले. त्यामुळे येत्या काळात अतिक्रमणांचे भूत नगरसेवकांच्या मानगुटीवर बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.शहरात अनधिकृत बांधकामांची बजबजपुरी झाली आहे. गाव-गावठाणात गरजेपोटीच्या नावाखाली अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. गावठाणाबाहेरील शासकीय मालकीच्या मोकळ्या जागेवर टोलेजंग इमारती उभारल्या गेल्या आहेत. मागील वीस वर्षांपासून हा प्रकार सर्रास सुरू आहे. शहराचे नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहणाऱ्या महापालिका प्रशासनाने या बांधकामांकडे सोयीस्कररीत्या डोळेझाक केली आहे. तर सिडकोने यासंदर्भात नेहमीच बोटचेपे धोरण अवलंबिले आहे. याचा फायदा भूमाफियांनी घेतला आहे. त्यांना स्थानिक नगरसेवकांचा अर्थपूर्ण पाठिंबा मिळाल्याने माहिती व तंत्रज्ञानाच्या सुनियोजित शहराला अनधिकृत बांधकामांचा वेढा पडला आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्थानिक नगरसेवकच जबाबदार आहेत. कारण बांधकाम उभारत असतानाच त्यांनी त्याला प्रतिबंध घातला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. परंतु अनेकांनी यात हात धुवून घेतले. काहींनी स्वत:च्या, आपल्या नातेवाइकांच्या किंवा स्नेहसंबंधीच्या नावांवर अनधिकृत गृहप्रकल्पातील घरे अडवून ठेवली आहेत. या प्रकाराला सर्वपक्षीय नगरसेवकांची मूक संमती राहिल्याने सुनियोजित शहराला अनधिकृत बांधकामांनी पोखरले आहे. असे असले तरी महापालिका आयुक्त मुंढे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे अनधिकृत बांधकामांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठबळ देणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिघ्यातील राष्ट्रवादीचे नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते या तीन नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार लटकत आहे. त्यांच्या सदस्यत्वाबाबत ४ जून रोजी आयुक्त मुंढे निर्णय घेणार आहेत. तसेच कोपरखैरणेतील माजी नगरसेवक केशव म्हात्रे यांनी स्थायी समिती सभापती शिवराम पाटील आणि त्यांच्या पत्नी अनिता पाटील यांच्यावर बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप करीत आयुक्तांकडे तक्रार केली आहे. आरटीआय कार्यकर्ते संजू मेनन यांनी बेलापूर येथील भाजपाचे नगरसेवक दीपक पवार यांच्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप केला आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्या पत्नी मंदाकिनी म्हात्रे यांच्या गोठीवली प्रभाग क्रमांक २४ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा आरोप मेनन यांनी केला आहे. या अतिक्रमणाला स्वत: रमाकांत म्हात्रे हेच जबाबदार असून याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मेनन यांनी केली आहे. येत्या काळात आणखी काही नगरसेवकांची अनधिकृत बांधकामे उघड होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. >आरटीआय कार्यकर्त्यांची चलतीअनधिकृत बांधकामांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष जबाबदार असणारे नगरसेवक, अधिकारी व राजकीय नेत्यांवर थेट कारवाई करण्याचे संकेत महापालिका आयुक्त मुंढे यांनी दिली आहे. त्यामुळे परस्पराचा वचपा काढण्यासाठी प्रमुख राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. प्रतिस्पर्धी पक्षातील नगरसेवकांचे अनधिकृत बांधकामे शोधून काढण्यासाठी आरटीआय कार्यकर्त्यांना कामाला लावण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात नवी मुंबईच्या राजकारणात अनधिकृत बांधकामे हा कळीचा मुद्दा बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बेकायदा बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. तसेच शहरातील पदपथ फेरीवालामुक्त करण्याच्या सूचना विभाग कार्यालयांना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. याचा परिणाम म्हणून शहरातील बहुतांशी रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. त्याचप्रमाणे सिडकोच्या सहकार्याने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. एकूणच अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांची गय न करण्याचा निर्धार आयुक्तांनी व्यक्त केला आहे.