नागपूर : न्यायालयाने आदेश देऊनही तांत्रिक कारणामुळे कारागृहातच अडकलेला कुख्यात गुंड अरुण गवळी ऊर्फ डॅडीची अखेर मंगळवारी दुपारी कारागृहातून पॅरोलवर सुटका झाली. सायंकाळी विमानाने डॅडी मुंबईला रवाना झाला. मुलगा महेश याच्या लग्नाच्या निमित्ताने गवळीने पॅरोल रजा मिळवण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र, सुरक्षेचे कारण पुढे करत आयुक्तांनी गवळीचा अर्ज फेटाळून लावला. परिणामी गवळीच्या वकिलांनी विभागीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने ती याचिका मान्य करीत गवळीची पॅरोलवर सुटका करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पुढील औपचारिकता पूर्ण करून गवळी कुुटुंबीय तसेच समर्थक शनिवारी दिवसभर कारागृह परिसरात होते. मात्र, विभागीय आयुक्तांकडून सुटकेचा आदेश येण्यास विलंब झाला. परिणामी शनिवारी गवळीची सुटका होऊ शकली नाही. रविवार आणि सोमवार शासकीय सुट्यांमुळे गवळीला कारागृहातच राहावे लागले. मंगळवारी सकाळी ११ पासून त्याच्या सुटकेची वाट बघत त्याचे वकील, नातेवाईक आणि स्थानिक तसेच मुंबईचे समर्थक कारागृहाबाहेर उभे होते. ‘जेल ब्रेक’मुळे हादरलेल्या कारागृह तसेच पोलीस प्रशासनाने कारागृहाच्या परिसरात प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. कारागृह अधिकाऱ्यांनी गवळीच्या सुटकेपूर्वीची कागदोपत्रांची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दुपारी १.३५ वाजता त्याला पॅरोलवर कारागृहातून सोडण्यात आले. गर्दी आणि धक्काबुक्कीकारागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर पडताच गवळीला त्याच्या समर्थकांनी गराडा घातला. सोबतच धंतोलीचे पोलीस निरीक्षक राजन माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गवळीभोवती सुरक्षा कडे करून त्याला कारागृह परिसराच्या उत्तरेकडील दाराबाहेर काढले. यावेळी बाहेर जमलेल्या त्याच्या समर्थकांनी एकच गलका केला. छायाचित्रकारांनी ‘डॉन’ला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी एकच गर्दी केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. साथीदारांनी समोरच्यांना धक्काबुक्की करीत डॉनला आलिशान कारमध्ये बसवले आणि रामनगरातील एका समर्थकाच्या निवासस्थानी नेले. तेथे काही तास घालवल्यानंतर सायंकाळच्या विमानाने डॉन मुंबईकडे रवाना झाला.
गवळीची पॅरोलवर सुटका
By admin | Updated: May 6, 2015 05:02 IST