अकोला : शाळांच्या संदर्भात पालकांच्या विविध तक्रारी असतात़ परंतु या तक्रारी कुठे कराव्यात, याची माहिती नसते. त्यामुळेच पालकांना तक्रार करणे सोपे जावे, यासाठी आता आॅनलाइन तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. आगामी एक महिन्यात ही यंत्रणा उभी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ शाळांकडून मनमानी पद्धतीने केली जाणारी शुल्कवाढ, शाळेत प्रवेश देण्यासाठी मागितली जाणारी कागदपत्रे, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश देताना होणारी टाळाटाळ यासह शिक्षण विभागाशी संबंधित पालकांच्या अनेक तक्रारी असतात. त्यातच अलीकडच्या काळात शाळांमध्ये स्कूलबसचालक व वाहकाकडून बालकांवर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या घटना टाळण्यासाठी एखाद्या शाळेकडून योग्य पाऊल उचलले जात नसेल तर कोणाशी संपर्क साधावा, यासंदर्भात पालकांना कोणतीही माहिती नसते. त्यामुळे यापुढे शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने आॅनलाइन तक्रार निवारण केंद्र उभारण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे़ त्यानुसार आगामी महिन्यात तक्रार निवारण यंत्रणा उभारण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)
शिक्षणासंबंधी तक्रारी करा आता आॅनलाइन!
By admin | Updated: December 26, 2014 02:02 IST