मोखाडा : पावसाळा आला की, आजही येथील गावंदपाड्यातील गावकऱ्यांसाठी पुढील चार महिने मोठे कसरतीचे असतात. नकाशावर हे गाव जरी जव्हार तालुक्यातील असले तरी बाजारपेठ, शाळा, दवाखाना आवश्यक गरजांसाठी त्यांना मोखाडा बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागते. मात्र, दरम्यानच्या नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात आजही या गावकऱ्यांची एकाकी अवस्था असते.आजही या गावातील गावकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, आबालवृद्धांना नजीकच्या मोखाडा बाजारपेठेमध्ये वस्तू खरेदीसाठी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाळेत तर रुग्णांना दवाखान्यात ये जा करण्यासाठी नदीवर पूल नसल्याने मोठी कसरत करावी लागत आहे. गावदंपाडा गावातील नागरिकांना मोखाडा ही तालुक्याची बाजारपेठ अगदी जवळ पडत असल्याने नेहमी मोखाड्याला ये-जा असते. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने १५ वर्षांपूर्वी गावदंपाडा गावानजीकच्या नदीवर पुलाचे बांधकाम पूर्ण केले खरे, मात्र पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने बांधकाम होऊन वर्षभराचा कालावधी पूर्ण होण्याअगोदरच पावसाच्या जोरदार प्रवाहाने पुलांचे स्लब वाहून गेले. अनेक वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही पुलाचे नूतनीकरण झाले नाही. (वार्ताहर) जव्हार या तालुक्याच्या ठिकाणापासून २० ते २२ किमी अंतरावर असलेल्या व मोखाडा बाजारपेठेपासून अवघ्या ५ ते ६ किमी अंतरावर गावदंपाडा हे गाव आहे. पावसाळ्यामध्ये नदीपात्रात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मोखाडा बाजारपेठेत येण्यासाठी पिंपरपाडा या गावाला वळसा घालून मोखाडा येथे यावे लागते.
गावंदपाडावासियांची पावसाळ्यात कसरत
By admin | Updated: June 29, 2016 03:22 IST