दिल्लीत गौरव : खाजगी इंग्रजी शाळांवर मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजीसई देशपांडे - नागपूरनागपूर : प्रतिभा आणि हुशारी यावर कुणाचीही मक्तेदारी नसते. या दोन्ही बाबी विकत घेताच येता नाही. प्रतिभावंताची प्रतिभा आणि हुशारी लपून राहात नाही, याचा प्रत्यय अनेकदा आपल्याला येतो. खाजगी इंग्रजी शाळेत शिकणारे विद्यार्थी जास्त हुशार असतात, असा लोकांचा समज असतो. त्यात मनपाच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तर फारच उपेक्षेचा असतो. पण मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेने खाजगी इंग्रजी माध्यमातील शाळांच्या विद्यार्थ्यांवर बौद्धिक मात करुन स्वत:ला सिद्ध केले. प्रतिभावंता पुढती गगन ठेंगणे, याचीच सिद्धता करीत त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत मिळविेलेले यश अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. साधारणत: ‘कॉन्व्हेंट’ शाळांमधील विद्यार्थी जास्त प्रतिभावंत असतात असा समज आहे. परंतु नागपूर महानगरपालिकेच्या वाल्मिकीनगर स्थित हिंदी शाळेतील विद्यार्थ्यांनी हा समज खोटा ठरवित मनपा शाळेतील विद्यार्थीदेखील संधीचे सोने करू शकतात हे दाखवून दिले आहे. नवी दिल्ली येथे शहरी योजना व आराखड्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या कौशल्याचे सादरीकरण करत या विद्यार्थ्यांनी देशभरातील नामांकित शाळांवर मात करीत दुसरा क्रमांक पटकाविला. बाल जनाग्रह या सामाजिक संस्थेतर्फे बंगळुरुच्या अंतर्गत शहरी योजना व आराखड्याच्या आधारावर रस्ते सर्वेक्षण स्पर्धेचे १६ जानेवारी रोजी दिल्लीत आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीने नागरिकांच्या कर्तव्याप्रती जागरुक करणे हा यामागचा उद्देश होता. यात वाल्मिक नगर येथील हिंदी माध्यम मनपा शाळेतील आठवीच्या ९ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. नागपूर स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी अव्वल क्रमांक पटकाविला होता. दिल्ली येथे आयोजित या स्पर्धेत एकूण ८ शाळांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यात दिल्ली, चंदीगड, डेहराडून, कानपुर, लखनौ, लुधियाना और भोपाळ येथील नामवंत ‘कॉन्व्हेंट’ शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. नागपूरच्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व वर्गशिक्षिका कमला मंगनानी यांनी केले. अशा प्रकारे पोहोचले दिल्लीतनागपूर स्तरावर आयोजित स्पर्धेला पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या ४ भागांमध्ये विभाजित करण्यात आले होते. यात वाल्मिकीनगर शाळा पहिल्या क्रमांकावर राहिली. यानंतर याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील शाळांना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकाविला. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना दिल्लीचे दरवाजे उघडले.यशाचे प्रमाण ९५ टक्केसर्वेक्षणात नमूद करण्यात आलेल्या १२ समस्यांपैकी प्रथम ६ समस्यांवर भर देण्यात आला. तीन समस्यांनुसार २० ते २१ जानेवारी रोजी गांधीनगर मार्गावरील झाडांची छाटणी करण्यात आली. त्यामुळे या मार्गावर प्रकाश येऊ लागला. शाळेची तुटलेली भिंत व प्रवेशद्वार बनविण्याचे काम सुरू झाले आहे. अशातऱ्हेने या सर्वेक्षणाच्या यशाची टक्केवारी ९५ टक्के राहिली. उर्वरित तीन समस्या काही दिवसांत दूर होणार, हे निश्चित आहे.
प्रतिभावंतापुढती गगन ठेंगणे!
By admin | Updated: February 6, 2015 01:02 IST