बेळगाव नाट्यसंमेलनाचे उद्घाटन : महाराष्ट्र-कर्नाटक या राज्यांतील कलासंस्कृतीचे अभिसरण थांबता कामा नयेप्रसन्न पाध्ये - बेळगाव(बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी, स्मिता तळवलकर रंगमंच) भाषिक वादावरून राजकीय व्यासपीठावर भांडणे होत राहतील, पण महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतील कलासंस्कृतीचे अभिसरण थांबता कामा नये, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली. ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन करताना, या नाट्यसंमेलनामुळे परस्पर संवाद वाढले, तर भाषिक वादाची दरी कमी होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.कर्नाटकाने नुसते काही घेतले नाही, तर बरेच काही दिलेही आहे. भारतरत्न पं. भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल यांनी मराठी मनावर कायम अधिराज्य गाजविले, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. संमेलनाचे मावळते अध्यक्ष अरुण काकडे, नूतन अध्यक्षा फय्याज शेख, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.गतकाळातील आठवणींना उजाळा देऊन पवार म्हणाले, मला इथल्या माणसाचे कौतुक वाटते की, प्रादेशिक सीमांनी पाच दशकांपूर्वी आपली ताटातूट केली तरी आमची मने अभंग आहेत. कारण तुमची-आमची नाळ याच मराठी मातीत पुरली आहे. नाळेचे कुणा प्रांताशी किंवा जातीशी नाते नसते, तर मातीशी असते.लोकशाहीच्या सिंहासनावरून रत्नपारखी नजर ठेवून कलेच्या वाटेतील काटे दूर सारणारे लोकप्रतिनिधी असल्यास कलाच नाही, तर कलाकारही समृद्ध होतील. राजकारणी मंडळी वरवर रुक्ष भासत असली तरी कलेची भुरळ आम्हालाही पडते, असे पवार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)‘जय महाराष्ट्र’ म्हणता म्हणता थांबलेशरद पवार कुठल्याही भाषणाचा समारोप ‘जय हिंद’ आणि ‘जय महाराष्ट्र’ असे म्हणून करतात, पण या नाट्यसंमेलनाची पार्श्वभूमी वेगळी असल्याने कलाकारांना शुभेच्छा देऊन पवार ‘जय हिंद’ म्हणाले आणि ‘जय महाराष्ट्र’ म्हणता म्हणता थांबले. याची कुजबूज उपस्थितांमध्ये होती.शिवरायांचा गजरशरद पवार यांनी संमेलनाचे उद्घाटन नटराज पूजन आणि दीपप्रज्वलनाने केले. त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत असताना काही तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा गजर केला. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशाही घोषणा दुमदुमल्या.बालप्रेक्षकांकडे पुन्हा वळावेनाटकांचा प्रेक्षकवर्ग कमी होत चाललाय याविषयी चर्चा सुरू होती. विशेषत: आजचा तरुण नाटक बघायला कमी येतो, अशी खंत व्यक्त करण्यात येत होती. आजच्या तरुणांची मानसिकता जाणून आशयप्रधान नाट्यनिर्मिती व्हायला हवी. पूर्वी प्रतिभावान कलावंत उत्तमोत्तम बालनाट्य करत असत. त्यामुळे बालप्रेक्षकांची एक पिढी तयार झाली. त्यांच्यावर नाट्यसंस्कार झाले, पण आज ते मध्यमवयीन झाले असतील, त्यामुळे बालप्रेक्षकांकडे पुन्हा वळावे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.मराठी भाषेचा गौरवउद्घाटनपर भाषणाची सुरुवात करताना पवार यांनी माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष आत्माराम भेंडे यांच्या निधनामुळे संमेलनाला दु:खाची किनार आहे, पण ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ जाहीर झाल्याचा आनंद असल्याचे सांगून हा पुरस्कार म्हणजे मराठी भाषेचा गौरव असल्याचे पवार म्हणाले.सीमाप्रश्नी साकडेबेळगाव : सीमाप्रश्नाच्या खटल्याबाबत लक्ष घालण्याची मागणी शनिवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मध्यवर्ती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांची बेळगावच्या सांबरा विमानतळावर एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. समितीच्या मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष वसंतराव पाटील, आमदार संभाजी पाटील, आमदार अरविंद पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, समितीचे बेळगाव शहर अध्यक्ष दीपक दळवी, माजी महापौर मालोजी अष्टेकर यांचा शिष्टमंडळात सहभाग होता.मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात समितीने सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाच्या खटल्याबाबत चर्चा करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली आहे. या निवेदनात वकिलांच्या समस्या, त्यांची फी, साक्षीदार नोंदविण्यासंदर्भातील त्रुटी, सरकारकडून दाखल करायचे प्रतिज्ञापत्र, साक्षीसंदर्भात गोखले इन्स्टिट्यूटच्या नेमणुकीसंदर्भात चर्चा आणि सीमाभागातील साक्षीपुरावे सादर करण्यासंदर्भातील समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली आहे. (प्रतिनिधी) मराठीजनांची घोषणाबाजीच्नाट्यसंमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडण्यासाठी बेळगावातील मराठीजनांचा एक गट अखेरपर्यंत आग्रही होता. नाट्यदिंडी बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरीच्या प्रवेशद्वारात येताच या गटाने प्रचंड घोषणाबाजी केली. उद््घाटन समारंभात भाषणे सुरू झाल्यानंतर या गटाने मांडवातच घोषणा द्यायला सुरुवात केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. च्‘जय भवानी, जय शिवाजी,’ ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ ‘बेळगाव आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं,’ अशा घोषणा या गटाकडून दिल्या जात होत्या. सुमारे पंधरा मिनिटे घोषणा सुरू होत्या. या गटाला बाहेर जाण्याची विनंती केल्यावर या मंडळींनी संमेलनस्थळाच्या बाहेर रस्त्यावर जाऊन घोषणा दिल्या. संमेलनाचे उद््घाटक शरद पवार बोलण्यास उभे राहिल्यानंतरही या गटाने घोषणा दिल्या.