ठाणे : मुंबई-अहमदाबाद तसेच मुंबई-आग्रा या महामार्गांवर वाहनचालकांना मारहाण करून वाहनांसह मुद्देमाल लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांच्या टोळीस ठाणे ग्रामीण पोलिसांनी ४८ तासांत अटक केली. त्यांच्याकडून ३३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, यातील चौघे गुजरातचे आहेत.मीरा रोड येथील नारायण ऊर्फ मनीष पटेल (३३) या म्होरक्यासह त्याचे गुजरातमधील साथीदार राजू पटेल (२४), गोटुलाल गुज्जर (२३), मनोहर गुज्जर (२४) आणि प्रभुलाल गुज्जर (२२) यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर या टोळीतील दोघे पसार झाले. १२ आॅगस्टच्या रात्री ११.३० च्या सुमारास तलासरीजवळ पाचवड येथे तांब्याच्या तारा वाहून नेणाऱ्या टेम्पोचालकास मारुतीतून आलेल्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्याकडील टेम्पोतील ५ टन वजनाच्या तांब्याच्या तारा आणि मोबाइल फोन असा २४ लाख २ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटला. ठाणे ग्रामीण पोलिसांनी ४८ तासांत पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून चोरलेल्या मालापैकी २३ लाख ४ हजारांच्या तारा, मारुती कार, चोरून नेलेला टेम्पो असा ३३ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. पटेल हा सराईत गुन्हेगार असल्याचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
महामार्गांवर लुटणारी टोळी गजाआड
By admin | Updated: August 26, 2014 04:05 IST