हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉर्इंटवर धाड : रोकड अन् सोन्यासह ९४ लाखांचा ऐवज जप्त नागपूर : शहरातील बहुचर्चित हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉर्इंटमधील जुगार अड्ड्यावर धाड घालून पोलिसांनी १३ जुगाऱ्यांना जेरबंद केले. पकडण्यात आलेल्यांमध्ये एका आंतराराष्ट्रीय बुकीसह, दुसऱ्या फळीतील नेते आणि व्यापाऱ्यांचाही समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून आठ लाखांची रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांसह ९४ लाखांचा ऐवज जप्त केला. वर्धा मार्गावरील हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉर्इंटमध्ये लाखोंचा जुगार सुरू असून, त्यात उपराजधानीतील अनेक बडे जुगारी बसून असल्याची माहिती डीसीपी अभिनाश कुमार यांना मिळाली. त्यांनी पहाटे २.३० च्या सुमारास सीताबर्डी आणि अंबाझरीतील निवडक पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन एअरपोर्ट सेंटर पॉर्इंट हॉटेलच्या रूम नंबर ३०२ मध्ये धडक दिली. पोलीस कारवाईसाठी येऊच शकत नाही, अशी खात्री असल्यामुळे आतमध्ये लाखोंची हारजीत सुरू होती. अचानक पोलीस रुममध्ये आल्यामुळे जुगाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली. पोलिसांनी कुख्यात बुकी सुनील मोहनलाल भाटिया (वय ३८, रा. बैरामजी टाऊन), अजय श्यामलाल जयस्वाल (वय ३१, रा. धरमपेठ), हरविंदरसिंग हरबंससिंग जंगी (वय ५०, रा. कापसी खुर्द), तुलसी देवराम वासवानी (वय ४४, रा. जरीपटका), देवा ऊर्फ देवानंद बाबासाहेब शिर्के (वय ४२, रा. तुकडोजी चौकाजवळ), आशिष हरिराम वर्मा (वय ४१, रा. लक्ष्मीनगर), हिमांशू घनश्याम वरुटकर (वय ३५, रा. लकडगंज), हितेश कमलकुमार धीरवानी (वय २७), मनीष दौलतराम घनश्यामानी (वय २८, रा. जरीपटका), मनोज ग्यानचंद जैन (वय ४९, रा. वर्धमाननगर), इरफान खान रफिक खान (वय २७, रा. मानकापूर) यांना जुगार खेळताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ८ लाख, १५ हजारांची रोकड, सुमारे ८८ लाखांचे सोन्याचे दागिने आणि अन्य साहित्यांसह ९४ लाख, ३४ हजारांचा ऐवज जप्त केला. हॉटेल व्यवस्थापनावरही कारवाईजुगाऱ्यांना हॉटेलची रूम आणि अन्य साहित्य उपलब्ध करून दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी हॉटेलमालक सत्येंद्रपाल सिंग अरोरा ऊर्फ एस. पी. सिंग, व्यवस्थापक मनिराम शालिकराम पंत आणि काउंटर सहायक अनुप व्यंकटराव येरखेडे यांनाही या प्रकरणी आरोपी बनविले. जुगार अड्डा जेथे भरला होता. त्या रुम नंबर ३०२ मधील दोन एलसीडी टीव्ही, टीव्ही खुर्च्या, टेबल, गादी आणि सोफाही जप्त केला. सोनेगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.सारेच ‘नामवंत‘जुगाराच्या अड्ड्यावरची आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई होय. यात पकडण्यात आलेल्यांपैकी सुनील भाटिया हा आंतराराष्टीय ‘स्पॉट फिक्सर‘ म्हणून कुपरिचित आहे. गेल्या वर्षी त्याला आंतराराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. शिर्के हा राजकारणाचे पांघरुण घेऊन प्रॉपर्टी डीलिंग करतो. जंगी हा ट्रान्सपोर्टर असून, अन्य जुगाऱ्यांमध्ये काही जण व्यापारी तर काही जण अवैध धंद्यांमध्ये गुंतले आहे. काही जुगाऱ्यांना यापूर्वीही अटक झालेली आहे. या सर्वांवर जुगार कायद्यानुसार गुन्हे दाखल करून त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले.आलिशान वाहनेही ताब्यात पोलिसांनी चार आलिशान वाहनेही ताब्यात घेतली. यात भाटियाच्या एका बीएमडब्ल्यू या महागड्या कारचाही समावेश आहे. जप्तीच्या ऐवजात वाहनांची किंमत जोडल्यास ही कारवाई दीड ते दोन कोटींच्या जप्तीची नोंद होऊ शकते. वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ही वाहने सोडून देण्यात आली. डीसीपी अभिनाशकुमार यांची गेल्या दोन महिन्यातील जुगार अड्ड्यावरची ही दुसरी मोठी कारवाई आहे. त्यांनी यापूर्वी डीसीपी यिशू सिंधू आणि डीसीपी निर्मलादेवी यांच्यासह अशोक बावाजी तसेच अन्य एका जुगार अड्ड्यावर कारवाई केली होती.