जान्हवी मोर्ये,डोंबिवली- नववर्ष स्वागतयात्रेनिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांना सुरुवात करणाऱ्या डोंबिवलीत यंदा भविष्याचा, उद्याचा वेध घेतला जाणार आहे. तसेच डोंबिवलीचे प्रदूषण कमी करणे, प्लास्टिकमुक्तीवरही जनजागृती केली जाणार आहे. या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी शनिवारी बैठक होणार आहे.याव्यतिरिक्त नागरिकांकडे ही काही संकल्पना असल्यास त्यांनी गणेश मंदिराशी संपर्क साधावा, असे आवाहन गणेश मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे. गणेश मंदिर संस्थानच्या वक्रतुंड सभागृहात स्वागतयात्रेसंबंधी चर्चा करण्यासाठी ४ मार्चला सायंकाळी ६.३० वाजता बैठक होईल, असे संस्थानचे पदाधिकारी प्रवीण दुधे यांनी सांगितले. स्वागतयात्रेत विषय हाताळणे आणि चित्ररथ काढणे एवढ्यावर न थांबता वर्षभर तो विषय हाताळण्यावर भर दिला जाणार आहे. प्लास्टिकमुक्तीसाठी करण्याच्या ठोस उपाययोजना आठदहा दिवसांत ठरतील. स्वागतयात्रेच्या बैठकीला ४० ते ४५ संस्थांचे साधारण ७० जण उपस्थित असतात. त्यांचा या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद असल्याचे दुधे म्हणाले. नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा एकोणिसावे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी ‘भविष्यातील डोंबिवली’ या थीममध्ये प्रदूषण, सुरक्षितता, दोन पिढ्यांतील अंतर, तरुणांचे स्वातंत्र्य यासारख्या विषयावर जनजागृती केली जाणार आहे.
भविष्याचा, उद्याचा वेध घेणारी डोंबिवली यंदाच्या स्वागतयात्रेत
By admin | Updated: March 4, 2017 03:49 IST