ऑनलाइन टीम
परळी(बीड), दि. ४ - गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यदर्शनासाठी वैद्यनाथ साखर कारखानाच्या प्रांगणात भाजप कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली आहे. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने मैदानावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मुंडे यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे - पालवे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
मंगळवारी सकाळी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेचे दिल्लीत अपघाती निधन झाले. मंगळवारी मुंबईतील पुर्णा येथील निवासस्थानी मुंडेचे पार्थिव ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी विशेष विमानाने मुंडेचे पार्थिव परळीत आणण्यात आले. वैद्यनाथ साखर कारखानाच्या प्रांगणात मुंडेचे पार्थिव दाखल होताच मैदानात उपस्थित असलेल्या लाखो कार्यकर्त्यांचा शोक अनावर केला. आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी मुंडेच्या पार्थिवाजवळ एकच गर्दी केली. पोलिसांनी जमावावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने पोलिसांना जुमानले नाही. अखेरीस पंकजा मुंडे - पालवे यांनी मंचावरुन कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मुंडेसाहेबांचा अपमान होईल असे वर्तन करु नका असे आवाहन त्या वारंवार करत आहेत.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, काँग्रेस - राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अंत्यसंस्कारासाठी मैदानात उपस्थित आहेत. पंकजा मुंडे या मुंडेच्या पार्थिवाला मुखाग्नी देणार असून अंत्यविधीला सुरुवात झाली आहे.