मुंबई : ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणून प्रसिद्ध असणारे डबेवाल्यांचे ज्येष्ठ नेते गंगाराम तळेकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी ४.३० वाजता पुणे जिल्ह्यातील गडद गावी अंत्यसंस्कार झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांचे ते वडील होत.गंगाराम तळेकर यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज दिला जाणार होता. मात्र सोमवारी रात्री १०.१५च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. डबेवाल्यांच्या संपूर्ण प्रवासात गंगाराम तळेकर यांचे मोलाचे योगदान आहे. १८९० साली महादेव हवाजी बच्चे यांनी १०० सहकाऱ्यांसह डबे पोहोचविण्याचा व्यवसाय सुरू केला. गेल्या सव्वाशे वर्षांत या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून, सध्या मुंबईत एकूण ५ हजार डबेवाल्यांना स्वयंरोजगार मिळतो आहे. (प्रतिनिधी)दिलगिरी : ‘लोकमत’च्या ३० डिसेंबर २०१४च्या अंकात ‘सुभाष तळेकर कालवश’ ही बातमी प्रसिद्ध झाली. या बातमीत अनवधानाने गंगाराम तळेकर यांच्याऐवजी सुभाष तळेकर कालवश असे प्रसिद्ध झाले. यामुळे तळेकर कुटुंबियांना झालेल्या मनस्तापाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. सुभाष तळेकर यांना आम्ही दीर्घायुष्य चिंतितो.
गंगाराम तळेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
By admin | Updated: December 31, 2014 01:57 IST