मुंबई : अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाचे काम गतिमान करण्यासाठी १ हजार ४३१ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या मार्गासाठी लागणारा राज्याचा निधी तत्काळ ‘स्वाधीन’ करा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना निक्षून बजाल्यानंतर तातडीने हा विषय मार्गी लागला. २०१९ पर्यंत या मार्गावर रेल्वे धावणार आहे.पंतप्रधानांनी रविवारी मुख्य सचिव क्षत्रिय यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला होता. नगर-बीड-परळी या २६१ किलोमीटरच्या रेल्वेमार्गासाठी केंद्र आणि राज्य शासनाने ५०-५० टक्के निधी देण्याचा निर्णय झालेला असताना राज्याचा निधी न मिळाल्याचा मुद्दा पस्थित झाला. आजपर्यंत हा निधी का देण्यात आला नाही, याची कारणे जाणून घेताच ‘क्षत्रियजी! यह पैसा आप जल्द से जल्द केंद्र के ‘स्वाधीन’ करे!’ असे फर्मान पंतप्रधानांनी सोडले. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर तातडीने हालचाली होऊन अधिक खल न करता प्रस्ताव मंजुरही झाला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाचा वाटा म्हणून भरीव निधी देण्याची घोषणा केली आहे़ दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी या मार्गासाठी प्रयत्न केले होते़ त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्या तथा महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे- पालवे यांनीही सातत्याने पाठपुरावा केला़ आता हा निधी गोपीनाथ मुंडे यांच्या पहिल्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झाला आहे, हे विशेष! (विशेष प्रतिनिधी)
नगर-बीड-परळी रेल्वेसाठी निधीचे इंधन!
By admin | Updated: June 3, 2015 03:15 IST