यदु जोशी, नागपूरमुंबईतील पोलीस आणि सफाई कामगारांच्या घरांच्या उभारणीतील सर्वात मोठा अडथळा दूर करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घरांसाठी ‘नो डेव्हलपमेंट झोन’मध्ये (एनडीझेड) दुप्पट चटई निर्देशांक (एफएसआय) देण्याचा निर्णय घेतला आहे. नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत फडणवीस यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. आतापर्यंत एनडीझेड क्षेत्रात घरांसाठी २ एफएसआय दिला जात होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घरे बांधता येत नव्हती. सात वर्षांपासून एकही नवीन घर उभे राहू शकले नव्हते. आता ४ एफएसआय देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक घरे उभारता येतील आणि घरांची योजना व्यवहार्यदेखील होऊ शकणार आहे. त्यामुळे पोलीस आणि सफाई कामगारांसाठी शासकीय वसाहती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गालगत फाईव्ह स्टार हॉटेल्स उभारण्यासाठी बांधकामात सूट देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. रेडिरेकनरच्या ७५ टक्के प्रीमियम भरून ही सूट मिळविता येईल. आतापर्यंत बड्या शहरांमध्ये असलेली ही हॉटेल्स आता महामार्गांवरही दिसू शकतील. या आधी कमी एफएसआय मिळत असल्याने बडी हॉटेल्स तेथे जाण्यास इच्छुक नसायची. आता हायवेलगतचे एनडीझेड क्षेत्र आणि अकृषक जमिनीवर फाईव्ह स्टार हॉटेल्ससाठी अधिक बांधकाम करता येणार आहे.
एफएसआय दुप्पट
By admin | Updated: December 19, 2014 04:56 IST