ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. ३१ - शिर्डी साई संस्थानच्या विश्वस्तपदी नियुक्त केलेल्या मंडळाने पदभार स्वीकारण्यापूर्वीच आज रविवारी भाजप कार्यकर्त्यांना साई दरबारी मोफत दर्शन घडवण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून संस्थानने व्ही व्ही आय पी दर्शना साठी शुल्क सुरु केले आहे. मंत्री वगळता खासदार , आमदार सुद्धा झटपट व्हीआयपी दर्शनासाठी पैसे मोजतात. दर्शनाच्या पास साठी दोनशे रुपये मोजावे लागतात. सकाळच्या आरतीसाठी सहाशे तर अन्य आरतीसाठी चारशे रुपये दर ठेवण्यात आलेला आहे.
आजवर या नियमाचे कठोर पालन झाले. दरम्यान काल पासून शिर्डीत भाजपचे नाशिक जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण सुरु आहे. यासाठी तीनशे पेक्षा कार्यकर्ते उपस्थित आहेत. आज या कार्यकर्त्यांना साई दरबारी मोफत दर्शन घडवण्यात आले. विशेष म्हणजे या सर्वांना नंदी गेट ने सोडण्यात आले. भाविकांना पैसे देऊनही या गेटने जाणे शक्य नसते.
आज अकरा वाजता नवीन पदाधिकारी पदभार स्वीकारणार आहेत, तत्पूर्वीच राजकीय कार्यकर्त्यांसाठी फुकट दर्शनाचे दरवाजे खुले झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.