पलूस : आघाडी फुटली आणि युती तुटली, यामुळे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील लढत चौरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. -हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे येथे वर्चस्व आहे. डॉ. कदम आताही काँग्रेसचे उमेदवार आहेत. डॉ. कदम यांना रोखण्यासाठी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमधून उमेदवारी अर्जही भरला. परंतु आघाडीत बिघाडी झाल्याने संदर्भ बदलला तरी, देशमुख राष्ट्रवादीच्या तंबूत परत येण्याची शक्यता नाही. त्यामुळे देशमुख भाजपकडून लढणार, हे निश्चित झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना हा महायुतीतील घटकपक्ष भाजपच्या वळचणीला गेल्याने संघटनेचे इच्छुक उमेदवार संदीप राजोबा यांना आता पृथ्वीराज देशमुख यांना पाठिंबा द्यावा लागणार आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याने आणि देशमुख यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्याने मतदारसंघातील राष्ट्रवादी कमकुवत झाली आहे. डॉ. कदम यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार म्हणून राष्ट्रवादीतील अरुण लाड, मोहनराव यादव (कडेपूर) आणि विठ्ठलराव येसुगडे (पलूस) यांच्याकडे पाहिले जाते. अरुण लाड यांना राष्ट्रवादीने पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी देण्याचा शब्द पाळला नाही. त्यामुळे लाड अपक्ष म्हणून लढले. परंतु त्यांचा पराभव झाला. या पराभवाने राष्ट्रवादीवर ते नाराज आहेत. परिणामी ते पृथ्वीराज देशमुखांना पाठिंबा जाहीर करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.मतदारसंघात शिवसेनेकडे डॉ. कदम यांना टक्कर देणारा तुल्यबळ उमेदवार नाही. येथे संजय विभुते किंवा लालासाहेब गोंदील यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.केंद्रात भाजपचे सरकार आणि लोकसभा मतदारसंघातील लाट त्यामुळे पृथ्वीराज देशमुख यांच्यामागे भाजप संपूर्ण ताकदीनिशी उभी राहणार यात शंका नाही. मात्र शिवसेनेने उमेदवार उभा केल्यास मतांची विभागणी होऊन येथील संभाव्य चौरंगी लढत अटीतटीची होणार आहे. यातच देशमुख यांना उमेदवारी दिल्यास बंडखोरी करण्याचा इशारा देणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड यांची भूमिका काय रहाणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या भूमिकेवर पुढील हालचाली होतील. (वार्ताहर)
पलूस-कडेगावमध्ये यावेळी चौरंगी लढत अपेक्षित
By admin | Updated: September 26, 2014 23:29 IST