लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कुसगाव येथे सोमवारी सकाळी रुग्णवाहिकेला झालेल्या भीषण अपघातात रुग्ण महिलेसह ४ ठार आणि ४ जण जखमी झाले.उषा नागुराव बोरकर (५५), त्यांचा मुलगा प्रवीण नागुराव बोरकर (३०), जावई नरसिंगराव किसनराव पतंगे (४२, सर्व जण राहणार नांदापूर, ता़ कळंबोली, नांदेड) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर चालक अब्दुल अजीज कलीम (२७, रा़ हैदरबाग, वेंगलूरनाका, नांदेड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वर्षा प्रवीण बोरकर (३०) व प्रशांत नागुराव बोरकर (३३, रा. नांदापूर, ता़ कळंबोली, नांदेड), डॉ़ आशिष दिवाकर मोरेश्वर (२७, रा़ ग्लोबल हॉस्पिटल, नांदेड), दुसरा चालक अब्दुल हमील वाघवान कुलारी (३८, रा़ वेंगलूरनाका नांदेड) हे जखमी झाले. प्रशांत बोरकर यांची प्रकृती गंभीर आहे़ संजीवनी माजी सैनिक महिला बचत गटाची रुग्णवाहिका नांदेड येथील ग्लोबल हॉस्पिटलमधून रुग्ण उषा बोरकर यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांना चेंंबूर, मुंबईतील रुग्णालयात घेऊन जात होते. सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास लोणावळ्याजवळ चालकाला डुलकी लागल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला. भरधाव रुग्णवाहिका महामार्गामध्ये असलेल्या गार्डनच्या चेंबरला धडकली़ ही धडक एवढी जबरदस्त होती की, त्यात बोरकर यांच्यासह अन्य दोघांचा जागीच मृत्यू झाला़ चार जखमींना तातडीने अपघातग्रस्त रुग्णवाहिकेतून बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दोन क्रेनच्या साहाय्याने गाडीचा दर्शनी व मागील भाग ओढून गाडीत अडकलेला जखमी चालक अब्दुल यास बाहेर काढण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ (प्रतिनिधी)
रुग्णवाहिका अपघातात चार जण ठार
By admin | Updated: August 26, 2014 03:52 IST