नागपूर : संपूर्ण राज्यात गाजलेल्या मोनिका किरणापुरे हत्याकांड खटल्यात मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्या न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर पुरावे नष्ट करण्याचा आरोप असलेल्या दोघांची निर्दोष मुक्तता केली. तसेच मुख्य सूत्रधाराला एक लाख आणि उर्वरित तिघांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व तो न भरल्यास आणखी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली़ दंडाच्या रकमेतील एक लाख रुपये मृत मोनिकाच्या कुटुंबाला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. मुख्य सूत्रधार कुणाल ऊर्फ गोलू जयस्वाल (२४), प्रदीप सहारे (२३) , श्रीकांत सोनेकर (२७) आणि उमेश ऊर्फ भुऱ्या मराठे (२४)अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. तर रामेश्वर सोनेकर (४२) आणि गीता मालधुरे (३२) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली़ नागपूर शहरातील दर्शन कॉलनी ते श्रीनगर दरम्यान रस्त्यावर मोनिका दशरथ किरणापुरे (२१) हिची ११ मार्च २०११ रोजी हत्या करण्यात आली होती़ त्यावेळी मोनिका नंदनवन येथील केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयात तृत्तीय वर्षाला शिकत होती आणि नंदनवनच्याच महिला वसतिगृहात राहत होती. कुणाल जयस्वाल हा काटोलच्या सेंट पॉल हायस्कूलमध्ये शिक्षक होता. त्याचे ज्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तिही केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयातच शिकत होती आणि त्याच महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहायला होती. कुणालने हॉटेलमध्येच प्रेयसीच्या खुनाचा कट रचला होता. त्यासाठी त्याने दीड लाखाची सुपारी दिली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक माधव गिरी यांनी केला. या खटल्यात ३१ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षी दोन्ही विचारात घेऊन न्यायालयाने कुणाल जयस्वालसह चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ तर दोघांची निर्दोष मुक्तता केला़ सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम तर आरोपींतर्फे अॅड. सुदीप जयस्वाल आणि अॅड. नितीन हिवसे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
मोनिका किरणापुरेच्या चार मारेकऱ्यांना जन्मठेप
By admin | Updated: June 3, 2015 01:53 IST