राहुल रनाळकर, मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत सर्वाधिक जागा जिंंकण्याची किमया भारतीय जनता पार्टीने साधली आहे. त्यामुळे आता मुंबईच्या वाट्याला नव्या मंत्रिमंडळात किमान दोन व जास्तीत जास्त ४-५ मंत्रिपदे येण्याची शक्यता राजकीय सूत्रांनी वर्तविली आहे. संभाव्य मंत्रिमंडळात मुंबईतून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले विनोद तावडे आणि सर्वात ज्येष्ठ आमदार प्रकाश महेता यांचा समावेश निश्चित मानला जात आहे.भाजपातील मंत्रिमंडळाची समीकरणे ही सरकार कसे बनते यावर अवलंबून आहेत. राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेऊन अल्पमतातील सरकार भाजपाने बनवल्यास ४२ ते ४३ जण मंत्री बनू शकतात. पण शिवसेनेसोबत सरकार बनवल्यास ही संख्या घटू शकते. त्यात शिवसेनेचा समसमान वाटा देण्याची मागणी भाजपाकडून कोणत्याही स्थितीत मान्य होण्याची शक्यता नाही. कारण भाजपाचे संख्याबळ शिवसेनेच्या संख्याबळाच्या दोनास तीन प्रमाणात आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत सरकार बनल्यास शिवसेनेच्या वाट्याला १३ ते १४ पेक्षा जास्त मंत्रिपदे येण्याची शक्यता नाही. ही बाब शिवसेनेच्या पचनी कशी पडणार, हा मोठा प्रश्न आहे. युतीच्या काळात जी मंत्रिपदे शिवसेनेकडे होती ती मंत्रिपदे भाजपाकडे आणि भाजपाची मंत्रिपदे शिवसेनेकडे येऊ शकतात. त्यामुळे जर शिवसेना सत्तेत सहभागी झाली तर मुंबईतील भाजपाची मंत्रिपदे कमी होऊ शकतात़ ती संख्या दोन पर्यंत येऊ शकते. अशावेळी विनोद तावडे आणि प्रकाश महेता यांचा समावेश निश्चित आहे.
भाजपा मंत्रिमंडळात मुंबईचे चार मंत्री ?
By admin | Updated: October 22, 2014 06:17 IST