चंदननगर : नगर रस्त्यावर तब्बल चार तास प्रचंड वाहतूककोंडी झाल्याने नगर रस्ता ब्लॉक झाल्याचा प्रकार सोमवारी (दि. १६) घडला.येरवड्यातील शाहदावल बाबा दर्ग्यापासून चंदननगर बायपासपर्यंत प्रचंड वाहतूककोंडी झाली. येरवडा, शास्रीनगर, रामवाडी, विमाननगर, सोमनाथनगर, टाटा गार्ड रूम, चंदननगर भुयारी मार्ग, चंदननगर-बायपास या मुख्यरस्त्यांसह संपूर्ण नगररस्ताच ब्लॉक झाल्याचे चित्र होते. मुख्य नगर रस्त्यासह वडगावशेरी, कल्याणीनगर, खराडी चौक, विडी कामगार, वडगावशेरी, द्वारका गार्डन, विमाननगरमधील सर्व चौकांमध्ये कोंडी झाली. हे सर्व चौक कोंडीत हरवले.नगर रस्ता संध्याकाळी सहापासून कोंडीत असून, रात्री उशिरापर्यंत वाहनचालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. या ठिकाणी दररोज संध्याकाळी सहा ते दहादरम्यान वाहतूककोंडी होऊन वाहने हळूहळू पुढे सरकत असतात. मात्र, सोमवारी वाहने एकाच ठिकाणी अडकल्याने जवळपास चार तास प्रचंड वाहतूककोंडी पाहावयास मिळाली. कल्याणीनगरमधील अॅडलॅब चौकात एक कार बंद पडल्याने मोठी वाहतूककोंडी झाली. त्यामुळे आज संध्याकाळी नगर रस्त्यावरील सर्व वाहतूक ठप्प झाली. (वार्ताहर)
नगर रस्त्यावर चार तास कोंडी
By admin | Updated: May 17, 2016 01:30 IST