नाशिक : उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून व्हॅलेंटाईन दिनाला चार मुली बेपत्ता झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या मुली टाकलीरोड, नारायणबापूनगर, शिवाजीनगरसारख्या गजबजलेल्या परिसरात राहणाऱ्या आहेत. या बेपत्ता झालेल्या मुलींचा सर्वत्र शोध घेतला जात असून त्यांच्या नातेवाईकांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या सर्व मुली सतरा ते अठरा वर्षे वयोगटातील आहे.टाकळी रोड येथे राहणारी १७ वर्षीय तरूणीने कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघाली मात्र सकाळी सात वाजेपासून तर दुपारपर्यंत ती घरी परतली नाही. जेलरोड येथील नारायणबापूनगरमधून व्हॅलेंटाईन दिनाच्या पुर्वसंध्येला दोन मुली बेपत्ता झाल्या आहेत. या मुली दुकानावर जाऊन येतो असे सांगून घरातून निघाल्या मात्र रात्री उशिरापर्यंत घरी आल्या नाहीत. यापैकी एका मुलीचे वय १८ ते दुसरीचे १६ वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवाजीनगर भागातील १७ वर्षाची मुलगी घरातून काहीही न सांगता अचानकपणे सकाळी निघून गेली आहे. या सर्व बेपत्ता झालेल्या मुलींचा त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला तसेच त्यांच्या मित्र-मैत्रिणींकडे व अन्य नातेवाईकांकडेही चौकशी केली; मात्र त्यांचा तपास लागू शकला नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करून पोलीस आयुक्तालय हद्दीसह नाशिक ग्रामिण हद्दीतही या मुलींच्या माहितीचा बिनतारी संदेश रवाना केला आहे.
व्हॅलेंटाईन दिनाला नाशिकमधून चार मुली बेपत्ता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2017 17:24 IST