पुणे : राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.राजस्थान, पंजाब व हरयाणा या भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. अद्याप मान्सून याच भागात सक्रीय असून राज्यावरही त्याचा प्रभाव आहे. तसेच पश्चिम-मध्य व लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टाही कायम आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसाने जोर धरला आहे. राज्याच्या अनेक भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुढील चार दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतही पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. रविवारी सकाळी साडे आठपर्यंतच्या चोवीस तासांत राज्यात मध्य महाराष्ट्रात अनेक भागांत जोरदार पाऊस पडला. विदर्भात जोर कमी राहिला. मुर्तिजापूर, चामोर्शी, गडचिरोली, अहेरी, बार्शीटाकळी, चिखली, महागाव, सिंदखेड-राजा या भागात पावसाचा जोर होता. घाटमाथ्यावर मात्र पावसाला फारसा जोर नव्हता. रविवारी दिवसभरात मुंबईत सांताक्रझ येथे १८ मिमी, महाबळेश्वर येथे ४ मिमी, पुण्यात लोहगाव परिसरात ५ मिमी तर सातारा येथे ०.२ मिमी पावसाची नोंद झाली.
चार दिवस मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2015 02:00 IST