सदानंद नाईक, उल्हासनगरकॅम्प नं. ४, परिसरातील सरकारी बालवसतिगृहातून शनिवारी चार मुले अचानक गायब झाली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या वर्षात मुले पळून जाण्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे सरकारी वसतिगृह प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. उल्हासनगरातील वसतिगृहांची देखभाल व दुरुस्ती वेळेवर होत नाही. त्यामुळे मुले पळून जाण्याच्या घटना वांरवार घडतात. कुर्ला कॅम्पमधील सरकारी बालगृहातून शनिवारी सायकांळी सचिन पवार (१३), पिंटू सिंग (१०), सुरज मोटे (१०) व कैलास माले (११) गायब झाल्याचे उघडकीस आले. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता, ती कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मुले गायब झाल्याची तक्रार करण्यात आली. ५० लाखांच्या निधीतून बांधलेले निरीक्षणगृह उद्घाटनाविना बंद आहे. निरीक्षणगृहातील सामानाच्या चोरीचे अनेक गुन्हे हिललाइन पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. शैक्षणिक साहित्याचा अभाव, निकृष्ट अन्न, स्वच्छ पाण्याचा अभाव, घसरलेला शैक्षणिक दर्जा, कपडे, अंथरुण आदी अनेक समस्यांचा विळखा वसतिगृहाला पडला आहे. (प्रतिनिधी)
उल्हासनगरात चार मुले वसतिगृहातून गायब
By admin | Updated: January 14, 2015 04:51 IST