मुंबई : राजश्री शाहू को-आॅप. क्रेडिट सोसायटीचे माजी अध्यक्ष परशुरम इंगळे यांनी कर्जाला कंटाळून घाटकोपर येथील कार्यालयातच दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली. क्रेडिट सोसायटीच्या १ कोटी ४० लाख रुपयांच्या कर्जवाटप घोटाळ्यामुळे इंगळे गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते. या आत्महत्येप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.घाटकोपर परिसरात इंगळे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष पदावर असताना झालेल्या १ कोटी ४० लाख रुपये घोटाळाप्रकरणी इंगळे यांची चौकशी सुरू होती. या घोटाळ्याचा तपास करणारे बँकेचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून कर्जवसुलीसाठी आणि रक्कम भरण्यासाठी त्यांना वारंवार फोन करून दबाव टाकत होते. याच तणावाखाली असलेल्या इंगळे यांनी पोलिसांंच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना भेटून येतो, असे सांगून घराबाहेर पडले. घाटकोपर येथील कार्यालयात पोचतात त्यांनी ही रक्कम आयुष्यात फेडणे शक्य नसल्याची सुसाइड नोट लिहून कार्यालयातच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. (प्रतिनिधी)
क्रेडिट सोसायटीच्या माजी अध्यक्षाची आत्महत्या
By admin | Updated: February 10, 2015 02:55 IST