खामगाव (जि. बुलडाणा) : खामगाव नगरपरिषदेच्या इमारत बांधकामात झालेल्या कथित अपहार प्रकरणी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. तथापि, हा प्रकार राजकीय षडयंत्रातून झाला असल्याचा आरोप सानंदा यांनी केला आहे. सन २00६ ते २०११ या काळात खामगाव नगरपरिषदेच्या इमारतीत आर्किटेक्ट नियुक्तीसह बांधकामातही भ्रष्टाचार झाल्याची तक्रार नगरसेवक संदीप वर्मा यांनी केली होती. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे वर्मा यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार खामगाव शहर पोलिसांनी सानंदा यांच्यासह नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा, माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई खासणे व संबंधितांवर गुन्हा दाखल केला. इमारत बांधकामाच्या खर्चावर लेखा परीक्षणातही आक्षेप नोंदविण्यात आले होते. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दिलीपकुमार सानंदा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. त्यानंतर आपल्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचा दावा सानंदा यांनी केला होता. (प्रतिनिधी)
माजी आमदार सानंदा यांना अपहार प्रकरणी अटक!
By admin | Updated: February 1, 2016 03:01 IST