ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ – राष्ट्रीय आयुष अभियानाच्या प्रभावी अमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य आयुष सोसायटी गठीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
या राज्य आयुष सोसायटीमध्ये राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ आणि कार्यकारी समितीचा समावेश असणार आहे. सदर योजनेची अमलबजावणी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग आणि कृषि व पुदम विभाग या विभागामार्फत एकत्रितपणे करण्यात येईल. आयुष अभियानात आरोग्य सेवा,आयुष वैद्यकीय शिक्षण, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व सिद्ध औषधी यांचे गुणवत्ता नियंत्रण, औषधी व वनस्पतीची लागवड व उपलब्धता हे घटक अनिवार्य असणार आहेत.
राज्य आयुष सोसायटीस अतिरीक्त व्यवस्थापकीय व तांत्रिक सहाय्यासाठी सदर मंडळ व समिती कार्यरत राहील. राज्य आरोग्य सोसायटी, नियामक मंडळ आणि कार्यकारी समितीची रचना व कार्य, राज्य कार्यक्रम व्यवस्थापन कक्षाची स्थापना संस्थापन करार, नियम व नियमावली हे शासन निर्णय , सार्वजनिक आरेाग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग आणि कृषी व पुदम विभाग या विभागामार्फत एकत्रितपणे करण्यात येईल. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.