मुंबई : गुजरात हा महाराष्ट्राचा छोटा भाऊ आहे, अशी कबुली देतानाच ‘कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' असा सवाल करण्याचे औधत्य भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवले असेले, तरी लोकसंख्या, साक्षरता, बालमृत्यू, कुपोषण, रस्त्यांची लांबी, वीज निर्मितीची स्थापित क्षमता अशा अनेकविध निकषांवर गुजरातच्या तुलनेत ‘कुठल्या कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र' हेच वास्तव आहे.लोकसंख्येच्या निकषावरच महाराष्ट्र हा गुजरातपेक्षा किती मोठा आहे हे स्पष्ट होते. महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी २३ लाख आहे तर गुजरातची लोकसंख्या ६ कोटी चार लाख आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्राची लोकसंख्या ९.४ टक्के आहे तर गुजरातची लोकसंख्या ४.९ टक्के आहे. महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण ८२.३ टक्के आहे तर गुजरातमधील साक्षरतेचे प्रमाण ७८ टक्के आहे. स्त्री भ्रूण हत्या विरोधी जागृती या विषयातही महाराष्ट्राने अधिक चांगली कामगिरी केली आहे. कारण एक हजार पुरुषांच्या मागे महाराष्ट्रात ९२५ स्त्रीया आहेत तर गुजरातमध्ये हेच प्रमाण ९१९ आहे. गुजरातमध्ये एक हजार बालकांपैकी ३८ जणांचे बालमृत्यू होतात तर महाराष्ट्रात हे प्रमाण एक हजारामागे २५ बालमृत्यू असे आहे. गरोदरपणात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही गुजरातमध्ये अधिक आहे. एक लाखांपैकी १२२ जणांचे गुजरातमध्ये मृत्यू होतात तर महाराष्ट्रात हे प्रमाण एक लाखापैकी ८७ इतके आहे.गेल्या पाच वर्षांत गुजरातचा विकास दर ८.७ टक्के आहे तर महाराष्ट्राचा विकास दर ७.१ टक्के आहे. म्हणजेच गुजरातचा विकासदर महाराष्ट्राच्या तुलनेत गेली पाच वर्षे केवळ १.६ टक्क्यांनी अधिक आहे. अनेक बाबतीत गुजरात महाराष्ट्राच्या पासंगाला पुरत नसताना या विकास दराचा डंका पिटणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुरु आहे. (विशेष प्रतिनिधी)
सदैव अग्रस्थानीच आहे महाराष्ट्र माझा!
By admin | Updated: October 9, 2014 04:34 IST