संपाचा नववा दिवस : जंगलाची सुरक्षा यंत्रणा कोलमडली नागपूर : गत नऊ दिवसांपासून रस्त्यावर उतलेल्या वन कर्मचाऱ्यांनी मंगळवारी संविधान चौकात सामूहिक ‘मुंडण’ करून, शासनाचा जाहीर निषेध नोंदविला. विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील आणि महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेचे अध्यक्ष विजय मेहर यांच्या नेतृत्वात गत २५ आॅगस्टपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. असे असताना या आंदोलनावर अजूनपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होत आहे. मंगळवारी सुमारे ५०० पेक्षा अधिक वन कर्मचारी संविधान चौकात एकत्रित झाले होते. यात महिला कर्मचाऱ्यांचा फार मोठा सहभाग होता. वन कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे अख्खा वन विभाग हादरला असून संपूर्ण संरक्षण यंत्रणा कोलमडली आहे. या आंदोलनात राज्यभरातील सुमारे २५ हजारांपेक्षा अधिक वनपाल, वनरक्षक व वनमजूर सहभागी झाले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गत अनेक वर्षांपासून लढा दिला जात आहे. पण शासनाने त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. वन कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांत वनपाल व वनरक्षकाच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यात यावी, निश्चित प्रवासभत्ता देण्यात यावा, राज्य सीमा तपासणी नाक्यावर वनपालाची नियुक्ती करण्यात यावी, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा व सवलती लागू करण्यात याव्या, वनपाल व वनरक्षकांना २४ तासाऐवजी आठ तासांचे काम देण्यात यावे, दहावी नापास वनपाल व वनरक्षकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा व रोजंदारी वन कामगारांना वनसेवेत स्थायी करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.मुंडण आंदोलनात वन कर्मचारी के. जे. बन्सोड, यू. पी. बावणे, डी. बी. खंडार, आर. एस. आदमने, किरपान, ए. एस. निनावे, पी. डी. वाघमारे, सतीश जांभुळकर, सुनील फुलझेले, जे. आर. तायडे, नरेंद्र पुरी, के. जे. चव्हाण, के. एम. मोटघरे, डी. जी. कुशवाह, एन. आर. फुकट, एम. जी. रेवतकर, रमेश गिरी, के. एस. अहिरकर, के. आर. नाकाडे, वासुदेव वाघाडे, व्ही. एन. लोणारे, व आर. एस. राठोड आदींनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी) पेंचचा ‘वाघ’ रामभरोसे गत नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पासह, बोर, मानसिंगदेव, नागझिरा, नवेगाव व उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील संपूर्ण संरक्षण यंत्रणा कोलमडली असून, येथील वाघांची सुरक्षा केवळ रामभरोसे सुरू आहे. विशेष म्हणजे, वन विभागाने या सर्व अभयारण्यातील वाघांच्या संरक्षणासाठी खास स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स (एसटीपीएफ) तैनात केले आहे. परंतु गत चार दिवसांपूर्वी त्या सर्व एसटीपीएफच्या जवानांनी आंदोलनात उडी घेतली आहे. यामुळे जंगलासह वाघांच्या सुरक्षेचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला असून, वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. यात काही वरिष्ठ वन अधिकारी फारच अस्वस्थ झाले असून, त्यांनी दबाव तंत्राचा वापर करीत आंदोलनात सहभागी झालेल्या वन कर्मचाऱ्यांना संपानंतर कामावर रुजू करून घेतले जाणार नाही, अशा धमक्या देणे सुरू केले असल्याची माहिती पुढे आली आहे. दुसरीकडे राज्यात सक्रिय असलेल्या शिकारी टोळ्या या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन, एखाद्या वाघाला टार्गेट तर कारणार नाही, ना, अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.
वन कर्मचाऱ्यांचे ‘मुंडण’ आंदोलन
By admin | Updated: September 3, 2014 01:16 IST